5 जून 2023 रोजीची ही घटना. तक्रारदार व्ही मूर्ती, जे 55 वर्षांचे आहेत. विझाग शहरातील ते रहिवासी. ते कुटुंबासह विशाखापट्टणमला जात होते. त्यासाठी तिरुपती रेल्वे स्टेशनला त्यांनी ट्रेन पकडली. आरामात आणि तणावमुक्त प्रवास व्हाला म्हणून त्यांनी तिरुमला एक्स्प्रेस ट्रेनच्या 3AC मधील 4 सीट्सचं रिझर्व्हेशन केलं होतं. B-7 कोचमध्ये बर्थ देण्यात आला होता. नंतर मूर्ती यांना रेल्वेकडून 3A ऐवजी 3E मध्ये सीट दिल्याचा मेसेज आला.
advertisement
मूर्ती कुटुंबाने तिरुपती रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडली. प्रवासादरम्यान गाडीच्या टॉयलेटमध्ये ते गेले. जिथं पाणी नव्हतं. शिवाय ट्रेनमध्ये एसी नीट नव्हता, डब्यातही अस्वच्छता होती. त्यामुळे आपली गैरसोय झाली अशी तक्रार त्यांनी संबंधित कार्यालयाकडे केली होती. पण समस्या सोडवण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं मूर्तींनी सांगितलं. प्रवासात अडचणींचा सामना करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान रेल्वेने या आरोपांनंतर आपली बाजू मांडली. मूर्ती यांनी सरकारी तिजोरीतून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी खोटे आरोप करून तक्रार दाखल केली. रेल्वेने दिलेल्या सेवांचा लाभ घेऊन ते आणि त्यांचं कुटुंब सुरक्षितपणे डेस्टिशनला पोहोचल्याचं म्हटलं.
General Knowledge : रेल्वे स्टेशनऐवजी मधेच उतरायचं असेल तर ट्रेनची चेन खेचून उतरू शकतो का?
मात्र कन्झ्युमर कोर्टाने प्रवाशाच्या बाजूने निकाल दिला. रेल्वेने सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचे आश्वासन देऊन तिकीट भाडे वसूल केलं असल्याने, शौचालयात पाणी, एसी आणि चांगलं वातावरण अशा किमान सुविधा देणं बंधनकारक आहे. सुविधा पुरविण्यात अपयश म्हणजे सेवेतील कमतरता असल्याचं न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलं.
विशाखापट्टणम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने दक्षिण मध्य रेल्वेला प्रवाशी आणि त्याच्या कुटुंबाला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासासाठी 25,000 रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेला कायदेशीर खर्च म्हणून अतिरिक्त 5,000 रुपये भरण्यास सांगितलं.