जमीन हडपण्यासाठी बीडमधील भावाचा खतरनाक प्लॅन, बुरखा घालून बहिणीच्या जागी बायको केली उभी, प्रकरणाचा शेवट झाला अजबच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
या प्रकरणात भावाने स्वतःच्या पत्नीस बहिणीच्या जागी उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्कसोडपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, सख्ख्या बहिणीच्या नावावर असलेला जमीनहक्क बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याचा आरोप भावावरच ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भावाने स्वतःच्या पत्नीस बहिणीच्या जागी उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्कसोडपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रजिया बानो यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जानुसार, त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या निधनानंतर बीड तालुक्यातील माळीपुरा येथील शेतजमीन ही सर्व वारसांमध्ये विभागली गेली होती. संबंधित जमिनीवर चार बहिणी आणि एक भाऊ अशी सर्वांची नावे कायदेशीररित्या 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाला आपापला हक्काचा हिस्सा मिळालेला होता.
मात्र, या सामयिक जमिनीतील बहिणींचा हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आरोपी भावाने कट रचल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या पत्नीच्या मदतीने एक बनावट ओळख निर्माण केली. नोंदणी प्रक्रियेदरम्यान पत्नीने बुरखा परिधान करून स्वतःला रजिया बानो असल्याचे भासवले आणि संबंधित कागदपत्रांवर बनावट सह्या करून हक्कसोडपत्र नोंदवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
advertisement
या बनावट व्यवहाराच्या आधारे आरोपीने महसूल नोंदीत स्वतःचे नाव लावून घेतल्याचेही उघड झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रजिया बानो यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी संबंधित पती-पत्नीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तसेच साक्षीदारांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सख्ख्या नात्यातील अशा फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
जमीन हडपण्यासाठी बीडमधील भावाचा खतरनाक प्लॅन, बुरखा घालून बहिणीच्या जागी बायको केली उभी, प्रकरणाचा शेवट झाला अजबच







