Ashok Kharat: भोंदू खरातचा आशीर्वाद अन् पुण्यातल्या कट्टर महिला भक्ताचं नशीब पालटलं, बांधकाम व्यवसायात पार्टनरशिप, करोडोंची माया जमवली?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील धागेदोरे आता नाशिकच्या बांधकाम व्यवसायापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातचे 'आशिर्वाद' असलेल्या या महिला भक्ताने बांधकाम व्यवसायात जम बसवल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक: स्वयंघोषित ज्योतिष असलेला भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवण्यात आली असून चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणातील धागेदोरे आता नाशिकच्या बांधकाम व्यवसायापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातचे 'आशिर्वाद' असलेल्या या महिला भक्ताने बांधकाम व्यवसायात जम बसवल्याची माहिती समोर येत आहे.
अशोक खरातची पुण्यातील एक महिला भक्त असून तिची राजकीय वर्तुळात उठबस असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातची ही कट्टर समर्थक समजली जाते. तिचे नाशिकमधील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांशी व्यावसायिक हितसंबंध असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. केवळ भागीदारीच नव्हे, तर अडचणीत आलेल्या विकासकांना वाचवण्यासाठी ही महिला आपल्या राजकीय वजनाचा वापर करत असल्याचा खळबळजनक आरोप आता होऊ लागला आहे.
advertisement
कामगाराचा मृत्यू आणि 'सेटलमेंट'चा प्रयत्न?
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील एका टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका निष्पाप कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा ठपका ठेवत पोलीस प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाईची तयारी दर्शवली होती. मात्र, ही माहिती मिळताच पुण्यातील 'त्या' महिला भक्ताने संबंधित विकासकाला वाचवण्यासाठी चक्रे फिरवल्याचे समजते. आपल्या राजकीय ओळखीचा धाक दाखवत पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा बांधकाम वर्तुळात रंगली आहे.
advertisement
पोलीस अधिकाऱ्याचा बाणा अन् महिला भक्ताची माघार...
राजकीय दबाव असूनही संबंधित पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणात नमती भूमिका घेण्यास नकार दिला. "एका व्यक्तीचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणारच," असा ठाम पवित्रा अधिकाऱ्याने घेतल्याचे समजते. पोलिसांच्या या कणखर भूमिकेमुळे अखेर त्या महिला पदाधिकाऱ्याला या प्रकरणात माघार घ्यावी लागली असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
advertisement
अनेक व्यवसायांत भागीदारीची चर्चा
संबंधित महिला भक्त अल्पवधीतच कोट्याधीश झाली असून, नाशिकमधील अनेक गृहप्रकल्पांमध्ये तिची छुपी भागीदारी असल्याची चर्चा आहे. राजकीय वजनाचा वापर करून प्रशासकीय अडथळे दूर करणे आणि त्या बदल्यात व्यावसायिक लाभ मिळवणे, अशी तिची कार्यपद्धती असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून आणखी काही बड्या धेंडांचे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: भोंदू खरातचा आशीर्वाद अन् पुण्यातल्या कट्टर महिला भक्ताचं नशीब पालटलं, बांधकाम व्यवसायात पार्टनरशिप, करोडोंची माया जमवली?






