पुणे एअरपोर्टवर खळबळ! 'चायनीज फूड'च्या डब्यात 26 कोटीचं काय होतं? उघडताच सगळे चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या मालामध्ये 'चिनी खाद्यपदार्थ' असल्याचे सांगण्यात आले होते.
पुणे: लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानतळ कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप पकडली आहे. यात चक्क २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त करण्यात आला आहे. तस्करांनी हा माल लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. गुरुवारी एअर कार्गो विभागात ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या मालामध्ये 'चिनी खाद्यपदार्थ' असल्याचे सांगण्यात आले होते. 'मँडरिन ऑरेंज सॅक्स' या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे पॅक केला होता. मात्र, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या बॉक्सचे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये मालाचे स्वरूप नैसर्गिक नसल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तपासणीचा फास आवळला.
advertisement
अधिकाऱ्यांनी जेव्हा एक बॉक्स उघडला, तेव्हा त्यात सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांमध्ये वरच्या बाजूला मिठासारखी पांढरी पावडर भरलेली होती. मात्र, जेव्हा ही पावडर बाजूला केली, तेव्हा आत व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पॅकमध्ये 'हायड्रोपोनिक गांजा' लपवलेला उघड झाला. संपूर्ण मालाची तपासणी केली असता, एकूण ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
advertisement
पुणे कस्टम्सने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, हा माल पुण्यात कोणाला मिळणार होता आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे एअरपोर्टवर खळबळ! 'चायनीज फूड'च्या डब्यात 26 कोटीचं काय होतं? उघडताच सगळे चक्रावले








