'सुपर नटवरलाल' धनीरामचा मृत्यू, खोटा न्यायाधीश बनून 40 दिवस चालवलं होतं खरं न्यायालय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
धनीराम मित्तलचा वयाच्या ८५व्या वर्षी मृत्यू झाला. धनीराम मित्तलला भारतातील सर्वात चलाख गुन्हेगारांपैकी एक मानलं जात होतं.
दिल्ली : सुपर नटवरलाल, इंडियन चार्ल्स शोभराज नावाने ओळखला जाणारा कुख्यात धनीराम मित्तलचा वयाच्या ८५व्या वर्षी मृत्यू झाला. धनीराम मित्तलला भारतातील सर्वात चलाख गुन्हेगारांपैकी एक मानलं जात होतं. कायद्याची पदवी घेतलेला धनीराम हा हस्ताक्षर तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजिस्टही होता. तरीही आपल्या बुद्धीमत्तेचा वापर चांगल्या पद्धतीने करण्याऐवजी त्याने चोरी आणि फसवणूक करण्याचा मार्ग निवडला होता. धनीराम मित्तलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय.
धनीरामचा जन्म हरियाणाच्या भिवानी इथं १९३९ मध्ये झाला. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, चंडिगढ, पंजाब या राज्यात त्याने एक हजारांहून अधिक कार चोरी केल्या. तो इतका चलाख होता की त्याने दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह इतर भागात भरदिवसा गाड्यांची चोरी केली होती.
कोणाचंही हस्ताक्षर हुबेहुब लिहिण्यात त्याचा हातखंडा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनीरामवर खोटी कागदपत्रे तयार केल्या प्रकरणात १५० गुन्हे दाखल होते. त्याने वकिलीची पदवी घेतली होती आणि आपल्या गुन्ह्यात स्वत:च न्यायालयात बाजू मांडत असे.
advertisement
खोट्या कागदपत्रांचा वापर करून रेल्वेत नोकरीही मिळवली. रेल्वेत १९६८ ते ७४ या काळात त्याने स्टेशन मास्टर म्हणून काम केलं. धनीरामने सर्वांना तेव्हा धक्का दिला जेव्हा तो खोट्या कागदपत्रांचा वापर करून न्यायाधीश बनला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर न्यायाधीश असताना त्याने थोड्या थोडक्या नाही तर २२७० आरोपींना जामीनसुद्धा दिला होता.
धनीरामने एका वृत्तपत्रात अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु असल्याचं वाचलं. त्यानंतर न्यायालय परिसरात जाऊन एक पत्र टायपिंग करून सीलबंद लिफाफ्यात ठेवलं. त्यावर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारचा खोटा स्टॅम्प लावला होता आणि सह्या होत्या. विभागीय चौकशीच्या न्यायाधीशाच्या नावाने ती पोस्ट केली. त्या पत्रात न्यायाधीशांना दोन महिने सुट्टीवर पाठवण्याचा आदेश होता आणि विशेष म्हणजे विभागीय चौकशी लागलेल्या न्यायाधीशानेही हे खरं समजलं आणि सुट्टीवर गेला.
advertisement
पुढच्याच दिवशी न्यायालयात हरियाणा उच्च न्यायालयातून आणखी एक लिफाफा आला त्यात दोन महिन्याच्या सुट्टीवर गेलेल्या न्यायाधीशाच्या जागी नव्या न्यायाधीशाची नियुक्ती केल्याचा आदेश होता. हे पत्रही धनीरामनेच पाठवलं होतं आणि तो न्यायाधीश बनला होता. न्यायालयातील स्टाफलासुद्धा ते खरं वाटलं आणि पुढचे ४० दिवस त्याने अनेक प्रकरणांची सुनावणी घेतली. हजारो खटले संपवले. धनीरामने यामध्ये २७४० आरोपींना जामीन दिला.
advertisement
धनीराम मित्तलने खोटा न्यायाधीश बनून स्वत:विरुद्धच्या खटल्यांचीही सुनावणी केली आणि स्वत:ला निर्दोष ठरवल्याचंही म्हटलं जातं. अधिकाऱ्यांना काय सुरू आहे हे कळण्याआधीच धनीरामने आपलं काम उरकलं होतं. मात्र धनीरामने केलेल्या उद्योगामुळे अख्खं प्रशासन कामाला लागलं. त्याने ज्या गुन्हेगारांना जामीन दिला होता त्यांना पुन्हा शोधून तुरुंगात टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाला लागलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 21, 2024 11:42 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'सुपर नटवरलाल' धनीरामचा मृत्यू, खोटा न्यायाधीश बनून 40 दिवस चालवलं होतं खरं न्यायालय