बॉलिवूडच्या एखाद्या हिरोईनपेक्षा सुंदर होती ती 'तवायफ' मंदिरातल्या पुजाऱ्यावर जडला होता जीव!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
गणिकेनं प्रियकरासाठी विष पिऊन जीव दिला. साबरा नावाच्या एकीनं प्रियकराचा व्यवसाय वाचवण्यासाठी स्वतःची सगळी संपत्ती विकून टाकली.
मुंबई : भारतात काही काळापूर्वी गणिकांच्या मैफिली रंगत असत. विविध भागांमध्ये त्यांचे कोठे असत, त्या ठिकाणी रंगलेल्या मैफिलींमध्ये अनेक लहान-मोठे, प्रसिद्ध लोक सहभागी होत असत. या संदर्भात पाटण्यातील एका गणिकेचा एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी मात्र खरी घडलेली ही घटना आहे. जवळपास 100 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. इतर मोठ्या शहरांप्रमाणेच पाटण्यातही गणिकांच्या मैफिली रंगत असत. विसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात पाटण्यात तन्नोबाई नावाच्या एका गणिकेचं एका मंदिराच्या पुजाऱ्यावर प्रेम जडलं. त्यांच्या प्रेमाचे किस्से अनेक वर्ष लोकांमध्ये चर्चेत होते. आणखीही काही गणिकांच्या प्रेमाचे किस्से त्याकाळी चर्चेत होते. आउटलूकमधील एका वृत्तानुसार, जिया अजीमाबादी या गणिकेनं प्रियकरासाठी विष पिऊन जीव दिला. साबरा नावाच्या एकीनं प्रियकराचा व्यवसाय वाचवण्यासाठी स्वतःची सगळी संपत्ती विकून टाकली. बी. चुट्टन हिने तिच्या तरुण प्रियकराला शिक्षण मिळावं, त्यानं प्रतिष्ठित वकील व्हावं म्हणून त्याची मदत केली. तसंच त्याच्या आईच्या आवडीच्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. या सगळ्यांपैकी तन्नोबाईचा किस्सा अनेक वर्षं लोकांमध्ये चर्चेत राहिला.
साधारणपणे 1920 च्या दशकात पाटणा शहरात सगळे सोहळे चौकाचौकांमध्ये साजरे होत. शहरातील गुडहट्टापासून ते चमडोरिया भागापर्यंत कलावंतिणींच्या कोठ्या होत्या. गुडहट्टाच्या त्या भागात असलेल्या तन्नोबाईला ‘मुजऱ्याची राणी’ असं नाव मिळालं होतं. तन्नोबाई अतिशय देखणी व सुंदर होती. श्रीमंत लोकांच्या मैफिलींमध्ये ती हमखास कला सादर करायची. ती बुद्धिमान, मृदु स्वभावाची आणि नृत्यात पारंगत होती. गायनातील कच्च्या व पक्क्या अशा दोन्ही प्रकारात तिने प्रभुत्व मिळवलं होतं. त्यामुळे अनेक संगीतप्रेमी तिच्या आलिशान कोठीवर यायचे. तिथे अनेक सुंदर झुंबरं लावलेली होती व गालिचे अंथरलेले होते.
advertisement
चौकातील कचौडी गल्लीत एक छोटं विष्णू मंदिर होतं. तिथे पुजारी म्हणून असलेले धरीक्षण तिवारी यांचं त्या भागात खूप नाव होतं. शहरातील श्रीमंत लोक त्यांचा कायम पाहुणचार करत असत. गोरे व उत्तम बांध्याचे, भागलपुरी टसर कुर्ता आणि पांढरं धोतर घालणारे तिवारी कर्मकांड, अस्पृश्यता मानणारे होते. मात्र त्यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांचा आवाजही चांगला होता. अनेक रागांची त्यांना जाण होती. धरीक्षण तिवारी एकदा दिवाण परिसरातील एका उच्चभ्रू लग्नात गेले असताना त्यांनी पहिल्यांदा तन्नोबाईंचं गाणं ऐकलं. भान हरपून ते त्या मैफिलीत सहभागी झाले. ते ब्राह्मण पुजारी म्हणजे समाजातील उच्चभ्रू वर्णातले असून व त्यांच्यासमोर गाणारी गणिका असूनही ते मंत्रमुग्ध होऊन मैफल ऐकत होते. तन्नोबाई गाताना मध्ये थांबली की तिवारी तिचं कौतुक करण्यासाठी स्वतःची मान हलवत असत.
advertisement

तन्नोबाईंला हा चाहता आवडला. ती रात्रभर तशीच गात राहिली. तिवारीदेखील गाण्याला मानेनं दाद देत राहिले, मात्र तोंडातून एक शब्दही बोलले नाहीत. तेव्हापासून तिवारी यांनी तन्नोबाईच्या सगळ्या मैफिलींना उपस्थिती लावली. ते हमखास तिथे जायचे. तन्नोबाईही त्यांना ओळखू लागली. तिवारींना पाहून तिचा उत्साह द्विगुणित व्हायचा. ती शालिनतेनं पुजारींना नमस्कार करायची. त्या दोघांमध्ये नमस्कार, अभिवादन आणि कौतुकासाठी मान हलवणं याशिवाय कोणतंच संभाषण होत नसे. ते दोघंही मर्यादा सांभाळून होते. साधारण 20-25 मुजरे झाल्यानंतर तन्नोबाईने तिवारी यांना पान खायला देण्याचं धारिष्ट्य केलं. मात्र तिवारी यांनी तो विडा कपाळाला लावला आणि रुमालात गुंडाळून खिशात ठेवला. तिवारी ते पान खाणार नाहीत, हे तन्नोबाईच्या लक्षात आलं. त्यांनी केवळ मान ठेवण्यासाठी ते स्वतःकडे ठेवून घेतलं.
advertisement
यानंतर काही महिने, वर्षं उलटली. एकदा कचौडी गल्लीतल्या जमिनदारानं तन्नोबाईला पाच दिवसांच्या मैफिलीसाठी आमंत्रित केलं. तिला एक हजार चांदीची नाणी दिली. तिथे गेल्यावर तन्नोबाईने धरीक्षण तिवारींना शोधलं, पण ते कुठेच दिसले नाहीत. त्यांनी तबलजींना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की गेल्या पौर्णिमेच्या रात्री तिवारी यांचं देहावसान झालं. ते ऐकून तन्नोबाई स्तब्ध झाली. तिने जमिनदाराची चांदीची नाणी परत केली व आज आपण गाऊ शकणार नाही असं सांगितलं.
advertisement
त्या दिवसानंतर तन्नोबाईला मोठा मानसिक धक्का बसला. तिची कोठीदेखील उदास दिसू लागली. ती दिवसभर निराश अवस्थेत राहू लागली. तिला मोठ्या रकमेची मैफिलींची आमंत्रणं मिळत होती, पण ती सगळी नाकारायची. हे असं सुरू राहिलं तर जगण्यासाठी तिच्याकडे पैसे उरले नसते. जवळच्या लोकांनी केलेल्या विनंतीमुळे तन्नोबाईने पुन्हा मैफिली सुरू केल्या. त्या गाजूही लागल्या, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी निराशा व खिन्नता असायची. कालांतरानं ते सगळं बंद करून तिने सगळा वेळ पूजाअर्चा करण्यात घालवू लागली. पन्नाशीमध्ये तिचं निधन झालं. पाटणा शहरात कच्ची दर्गा इथं तिचा दफनविधी झाला. मूलबाळ नसल्यानं तिने सगळी संपत्ती एक अनाथाश्रम आणि मदरशाला दान केली.
advertisement
धरीक्षण तिवारी यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्यांच्या पत्नीला तिवारी यांच्या एका रुमालात एक सुकलेला विडा व्यवस्थिपणे ठेवलेला दिसला. तिवारी कधीच पान खात नव्हते. त्यामुळे त्यांच्या रुमालात तो विडा कसा आला हे त्यांच्या पत्नीसाठी रहस्य बनून राहिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2024 10:13 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
बॉलिवूडच्या एखाद्या हिरोईनपेक्षा सुंदर होती ती 'तवायफ' मंदिरातल्या पुजाऱ्यावर जडला होता जीव!