मुंबईकर काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढला, महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Summer Health Care: मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळे मोठं संकट आलं असून नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुंबई : मुंबईत फेब्रुवारीपासूनच तापमानात मोठी वाढ झालीये. मार्चमध्ये उष्मतेच्या लाटांनी मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतेय. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच उष्माघात, अशक्तपणा, डोकेदुखी आणि त्वचेसंबंधी समस्या टाळण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उन्हात बाहेर पडू नका
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमान 38 अंशांच्या पुढे गेल्यामुळे अनेकांना चक्कर येणे, घामोळ्यांचा त्रास, पायांमध्ये पेटके येणे आणि उष्णतेमुळे अशक्तपणा जाणवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उष्णतेचा दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत बाहेर पडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
उष्माघाताचा धोका
उष्णतेचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. सतत घाम येणे, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. वेळेत उपचार न केल्यास उष्माघात गंभीर रूप धारण करू शकतो आणि त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि थंड ठिकाणी राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
त्वचेची काळजी घ्या
वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवरही दिसून येत आहे. सतत निघणाऱ्या घामामुळे त्वचा कोरडी पडत असून, धुळीमुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढला आहे. विशेषतः पायांना आणि बोटांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने बाहेरून आल्यावर स्वच्छ पाय धुण्याचा सल्ला दिला जात आहे. उन्हात बाहेर पडताना त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा वापर करावा आणि शक्य असल्यास संत्री, मोसंबी यांसारखी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि तृणधान्यांचा आहारात समावेश करावा, असे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
आहाराकडे लक्ष द्या
उन्हाळ्यात आहारात संतुलन आवश्यक असते. त्यासाठी पुरेसे पाणी प्या. घसा कोरडा पडतोय यासाठी अति थंडगार पाणी पिणे टाळा. उन्हाळ्यात अन्न पचायला जड असते. त्यामुळे भूकेपेक्षा कमीच आहार घ्या. मसाल्याचे पदार्थ कमी खावेत. धणे, जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती वाढवून शरीराला थंडपणा आणते. कैरीचे पन्हे, कोकम सरबत यांमुळे शरीरातील उष्णता कमी होते व शरीर शीतल राहते. तसेच दही, ताक व लस्सी हे देखील उन्हाळ्यात लाभदायी ठरतात.
advertisement
महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत उन्हाळ्यातील तापमानाचा सामना करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 8:54 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
मुंबईकर काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढला, महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का?