विठुरायाला एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला? वारकरी संप्रदाय नाराज, वाद पेटला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एकादशीच्या विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा आणि वारकरी संप्रदायाचे नियम यांच्यात आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. चैत्र एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला 'पुरणपोळीचा' नैवेद्य दाखवल्याने वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाने आता वादाचे रूप धारण केले आहे. एकादशीच्या विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विठूरायाची नगरी पंढरपूर सध्या हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. चैत्री एकादशीनिमित्त उन्हाचा तडाखा सोसत लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत. मात्र, याच सोहळ्यात विठ्ठलाला दाखवण्यात आलेल्या एका नैवेद्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. विठ्ठल पाटील महाराज म्हणाले की, एकादशीच्या दिवशी उपवासाचे विशेष महत्त्व असते. अशा दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणे म्हणजे एकादशी व्रताच्या तत्वांना विरोध करणारे आहे. देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा भक्तांच्या आचारसंहितेशी सुसंगत असावा.
advertisement
मंदिर प्रशासनाने याचा खुलासा करण्याची मागणी
वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनी एकादशीच्या व्रताचे आणि उपवासाचे महत्त्व सांगितले आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. आम्ही पिढ्यानपिढ्या कडक निर्जला एकादशी करतो आणि आमचा पांडुरंग पुरणपोळी खातो, असा संदेश यातून जात आहे. हा प्रकार निंदनीय असून मंदिर प्रशासनाने याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
मंदिर प्रशासनचे नेमकं म्हणणे काय?
दुसरीकडे, मंदिर प्रशासनाकडून या नैवेद्याचे समर्थन करत म्हटले आहे की, , चैत्र एकादशीला विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या प्रथेनुसारच यंदाही नैवेद्य दाखवण्यात आला असून, यात कोणतीही नवीन गोष्ट नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे आख्यिका?
या नैवेद्यामागे एक पुरातन आख्यायिका सांगितली जाते. तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा होता. या विवाहाला विठ्ठल-रखुमाई उपस्थित होते. लग्नानंतरच्या भोजनात विठ्ठलाने एकादशी असूनही उपवास मोडला आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतला, असा उल्लेख पुराणात असल्याचे सांगितले जाते. याच परंपरेचे जतन करण्यासाठी दरवर्षी चैत्री एकादशीला मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विठुरायाला एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला? वारकरी संप्रदाय नाराज, वाद पेटला









