CM Arogya Sahayta Nidhi : आता काळजी करायची नाही! हृदयविकार असो किंवा कॅन्सर, ११ आजारांसाठी सरकार देणार पैसे, पात्रता काय? अर्ज कुठे करायचा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
CM Arogya Sahayta Nidhi : राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध शासकीय आरोग्य योजना राबवण्यात येत आहेत.
मुंबई : राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध शासकीय आरोग्य योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा योग्य आणि प्रभावी वापर व्हावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे. शासनाने नागरिकांना प्रथम इतर उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे, त्यानंतरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोफत उपचारांसाठी प्राधान्य योजना
राज्यातील रुग्णांनी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत अनेक आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित जिल्ह्यातील समन्वयकांशी संपर्क साधून रुग्णाला नोंदणीकृत (Empaneled) रुग्णालयात दाखल करता येते.
चॅरिटी रुग्णालयांचा पर्याय
मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवण्यासाठी जिल्ह्यातील धर्मादाय (चॅरिटी) रुग्णालयेही एक महत्त्वाचा पर्याय आहेत. येथे उपलब्ध बेडची माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर कार्यालयातून मिळवता येते. त्यानुसार रुग्णाला योग्य ठिकाणी दाखल करून उपचार करता येतात.
advertisement
बालकांसाठी विशेष योजना
० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेद्वारे बालकांच्या विविध आजारांवर उपचार करून आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कधी मिळतो?
वरील सर्व योजनांचा लाभ मिळू न शकलेल्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा महत्त्वाचा पर्याय ठरतो. हृदयविकार, मेंदूविकार, कर्करोग, अपघात, डायलिसिस, मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण, हृदयप्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांसारख्या ११ गंभीर आजारांसाठी या निधीतून आर्थिक मदत दिली जाते.ही मदत वैद्यकीय समितीच्या तपासणीनंतरच मंजूर केली जाते.
advertisement
अर्ज करताना आवश्यक बाबी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये डॉक्टरांच्या सहीसह वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक, तहसीलदाराकडील उत्पन्नाचा दाखला (१.६० लाख रुपयांखाली), आधार कार्ड, रेशन कार्ड आणि संबंधित आजाराचे वैद्यकीय अहवाल यांचा समावेश आहे.
अपघाताच्या प्रकरणात FIR किंवा MLC आवश्यक असते, तर अवयव प्रत्यारोपणाच्या प्रकरणात संबंधित रुग्णालयाची मान्यता किंवा ZTCC नोंदणीची कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज ई-मेलद्वारे पाठवताना सर्व कागदपत्रे स्पष्ट PDF स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
advertisement
महत्त्वाच्या अटी आणि निर्बंध
रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर सहाय्यता निधीसाठी अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जात नाही. तसेच राज्याबाहेरील रुग्णालयांमध्ये झालेल्या उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जात नाही, कारण अशा रुग्णालयांवर राज्य सरकारचे नियंत्रण नसते.
याशिवाय, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या शिफारशीनुसार मंजूर झालेल्या रकमेपैकी केवळ ५० टक्के रक्कमच सहाय्यता निधीतून दिली जाते.
योग्य वापरासाठी नागरिकांनी काय करावे?
शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेणे हे नागरिकांच्या हिताचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मर्यादित संसाधन असलेला निधी असल्याने तो अत्यावश्यक रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रथम इतर योजनांचा लाभ घेऊन, त्यानंतरच या निधीसाठी अर्ज करणे अधिक योग्य ठरते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Arogya Sahayta Nidhi : आता काळजी करायची नाही! हृदयविकार असो किंवा कॅन्सर, ११ आजारांसाठी सरकार देणार पैसे, पात्रता काय? अर्ज कुठे करायचा?








