Pune News: पुणे पोलीस दलात खळबळ! त्या व्यक्तीसोबतची 'दोस्ती' नडली; पोलिसालाच मिळाली 'मोठी शिक्षा'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
संबंधित पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजेवर असतानाही सोमवार पेठ येथील सराईत गुन्हेगार प्रवीण राजेंद्र चव्हाण याच्या सतत संपर्कात होता.
पुणे : पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अवैध धंदे चालवणाऱ्या गुन्हेगाराच्या संपर्कात राहणे चांगलेच महागात पडले आहे. सराईत गुन्हेगाराशी जवळीक ठेवल्याप्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कडक शिक्षा सुनावल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजेवर असतानाही सोमवार पेठ येथील सराईत गुन्हेगार प्रवीण राजेंद्र चव्हाण याच्या सतत संपर्कात होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत या कर्मचाऱ्याने चव्हाणशी तब्बल आठ वेळा संपर्क साधल्याचे तांत्रिक तपासात स्पष्ट झाले. प्रवीण चव्हाण याच्यावर जुगार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दंगल आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगाराशी पोलिसाने संपर्क ठेवणे हे शिस्तभंग मानून ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरुवातीला दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्तावित निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने मांडलेले म्हणणे आणि बाजू विचारात घेऊन प्रशासनाने शिक्षेचे स्वरूप बदलून एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश दिला आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणात गुन्हे शाखेतील दोन कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ते देखील याच गुन्हेगाराच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले होते.
advertisement
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून 'क्लीन पोलीस फोर्स' या मोहिमेवर भर दिला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच या कारवाईतून देण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 12:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणे पोलीस दलात खळबळ! त्या व्यक्तीसोबतची 'दोस्ती' नडली; पोलिसालाच मिळाली 'मोठी शिक्षा'










