Baramati Congress Candidate: अखेर सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलाच, मल्लिकार्जून खरगेंकडून घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Baramati Bypoll Congress Candidate: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बारामतीसाठी काँग्रेसकडून आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई : अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याकरिता काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बारामतीसाठी काँग्रेसकडून आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आकाश विश्वनाथ मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीला जाणार आहेत.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने पुढाकार घेतला होता. मात्र काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून बारामती विधानसभा लढण्याचे ठरवले होते. त्यानुसार काँग्रेलने आकाश विश्वनाथ मोरे यांना बारामतीच्या रणांगणात उतरवण्याचे ठरवले आहे. आकाश मोरे सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आता अधिकृतपणे काँग्रेस उमेदवाराचे आव्हान असणार आहे.
advertisement
ठाकरे-सपकाळांना सुनेत्रा पवारांचा फोन पण प्रयत्न निष्फळ
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खुद्द सुनेत्रा पवार यांनी भरपूर प्रयत्न केले. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. परंतु काँग्रेस पक्ष निवडणूक लढविण्यावर अखेपर्यंत ठाम होता. अखेर, रविवारी रात्री काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशानुसार आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली गेली.
advertisement
कोण आहे आकाश मोरे?
आकाश मोरे हे कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत
माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते सुपुत्र आहेत
२०१४ साली साली अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती
२०१४ साली सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने बारामतीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती
advertisement
सुनेत्रा पवार उद्याच निवडणूक अर्ज दाखल करणार
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उद्या सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी बारामती दौरा नियोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून दुपारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजता विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्या अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते सकाळी साडे दहा ते दुपारी सव्वा बारा या वेळेत कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, जिथे त्या मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर दुपारी १२:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करणार आहेत.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati Congress Candidate: अखेर सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलाच, मल्लिकार्जून खरगेंकडून घोषणा








