माणुसकी मेली! जळगावात स्मशानभूमीतून महिलेचं डोकं अन् हातपायांच्या अस्थी चोरीला, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी चोरीला गेल्या आहेत.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र अंत्यसंस्कारानंतर संबंधित महिलेच्या अस्थी चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्याने महिलेचं डोकं, हात आणि पायाच्या अस्थी चोरून नेल्या आहेत. या प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांकडून अस्थी परत करण्याची भावनिक मागणी केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी मयत महिलेच्या अंगावरील सोने चोरून नेण्यासाठीच अस्थी चोरल्याचा परिवाराचा आरोप आहे. “सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी मागणी मयताच्या कुटुंबांनी केली आहे. पण अद्याप कुणीच अस्थी परत दिल्या नाहीत. यामुळे पाटील परिवार आणि आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे. स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
जळगाव शहरातील गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. मयत छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेला आहे.
advertisement
या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले. मेलेल्या नागरिकांची अस्थीही सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. सदर प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसला तरी, चोरट्यांचा शोध घेणे ही पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Oct 07, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
माणुसकी मेली! जळगावात स्मशानभूमीतून महिलेचं डोकं अन् हातपायांच्या अस्थी चोरीला, नेमकं प्रकरण काय?











