सांगलीच्या स्मशनात विवाहित महिलेवर करणी; हळदी कुंकू लावलेले 50 लिंबू, जनावराचं काळीज; गाठोड्याने गूढ वाढलं
- Reported by:Asif Mursal
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सांगलीच्या कामेरी येथील स्मशानभूमीत असणाऱ्या एका झाडाला काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडे आढळून आले.
सांगली : सांगली जिल्ह्यातील कामेरी गावातील स्मशानभूमीत करणी-भानामती व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कामेरी येथील स्मशानभूमीत असणाऱ्या एका झाडाला काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडे आढळून आले. या गाठोड्यात काळ्या बाहुल्या, करणीसाठी वापरले जाणारे साहित्य असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय स्मशानभूमीत ठेवलेल्या मटक्यामध्ये प्राण्याचे काळीज, काळी बाहुली, हळद-कुंकू टाकून कापून ठेवलेली तब्बल 50 लिंबू, पपई, कवड्या, काळे तीळ, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे तसेच लोखंडी खिळे आणि वेल असे साहित्य आढळून आले.
या प्रकारावरून एखाद्या विवाहित महिलेवर करणी किंवा जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्मशानभूमी सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने साहित्य ठेवण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी सकाळच्या सुमारास स्मशानभूमीत जात असताना हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने याबाबत माहिती देण्यात आली.
करणीचे साहित्य जाळले
घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून हा प्रकार अंधश्रद्धा व जादूटोण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी करणीसाठी ठेवलेले सर्व साहित्य गोळा करून ते जाळून टाकले. यावेळी गावकऱ्यांनाही अंधश्रद्धा, करणी-भानामती याबाबत जनजागृती करण्यात आली.
advertisement
समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारांमुळे समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. करणी-भानामतीला कोणताही शास्त्रीय आधार नसून नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये, तसेच अशा घटना निदर्शनास आल्यास तातडीने प्रशासन किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण
advertisement
या घटनेमुळे कामेरी गावासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, अशा अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई आणि अधिक प्रभावी जनजागृतीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीच्या स्मशनात विवाहित महिलेवर करणी; हळदी कुंकू लावलेले 50 लिंबू, जनावराचं काळीज; गाठोड्याने गूढ वाढलं










