तटकरे-गोगावले यांच्यात वाकयुद्ध, दानवे-खोतकर यांचाही वाद, सत्ताधाऱ्यांमध्येच खडाखडी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतल्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
नरेश बोबाटे, प्रतिनिधी, मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतल्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून विस्तवही जात नाही. अशातच रायगडच्या महाड नगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने महायुतीत ठिणगी पडलीय. त्यामुळे शिवसेनेने सर्व वीस उमेदवार जाहीर करत एकला चलोचा नारा दिलाय. यावरून गोगावले आणि तटकरेंमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटलंय.
एकीकडे रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे शिंदेंचा बालेकिल्ला कल्याणमध्ये महापौरपदावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे केले जाताहेत.
रायगड आणि कल्याणमध्येच नव्हे तर जालन्यातील महापालिका निवडणुकीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खणाखणी सुरू आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंमध्ये वार-पलटवार सुरू झालेत. युती करा असं आधीच बोललोय नाहीतर टांगा पलटी घोडे फरार, असे खोतकर म्हणाले. तर आधी युतीची भाषा मग टीका हे योग्य नाही. सगळ्यांनी संयमांनं घ्यावं, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
advertisement
जळगावमध्येही मंत्री गुलाबराव पाटलांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना थेट इशारा दिलाय. सन्मानाने युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
महायुतीच्या नेत्यांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हानांचा सामना रंगलेला असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी सामोपचाराची भूमिका घेतलीय. जिल्ह्यामध्ये शक्य तिथे युती झाली आहे. या जिल्हास्तरावरच्या निवडणुका आहेत. महापालिकेत मोठी शहरं आहेत. जिथं शक्य असेल तिथे आमची युती होईल, असे ते म्हणाले.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण निवडणूक लढवावी अशी इच्छा असते. या पार्श्वभूमीवर एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जातंय...या पार्श्वभूमीवर महायुतीत कोणतीही टोकाची कटुता न येता मध्यममार्ग काढण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरे-गोगावले यांच्यात वाकयुद्ध, दानवे-खोतकर यांचाही वाद, सत्ताधाऱ्यांमध्येच खडाखडी


