Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय खोलात! प्रकरणात ED च्या एन्ट्रीनंतर आणखी एक धक्का
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ashok Kharat ED registers money laundering Case : भोंदू अशोक खरात याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपासाला सुरुवात झाली असून खरात या प्रकरणात चांगलाच फसण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat ED registers money laundering Case : नाशिकचा भोंदूबाबा असलेला अशोक खरात आता कायद्याच्या चौकटीत चांगलाच अडकला आहे. एक दिवसांपूर्वी या प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या प्रकरणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) थेट खासगी व्यक्तीपर्यंत कसे पोहोचले, याबाबतही सखोल चौकशीचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. अशातच आता ईडीने अशोक खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
ईडीकडून तपासाला सुरुवात
भोंदू अशोक खरात याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपासाला सुरुवात झाली असून खरात या प्रकरणात चांगलाच फसण्याची शक्यता आहे. ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा म्हणजेच (ECIR) दाखल केला असून प्राथमिक तपासला सुरुवात केली. नाशिक पोलिसांकडून ईडीने अशोक खरात प्रकरणाची सर्व कागदपत्रे मागवून घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा
अशोक खरात प्रकरणात विशेष पथकाचा तपास आता खरात याने भोंदूगिरीतून उभ्या केलेल्या आर्थिक नेटवर्कवर वळला आहे. यातून शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांना विशेष पथकाने चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. साई संस्थानचा एक माजी विश्वस्त देखील चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डीत (Shirdi) बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार
अशोक खरात याचा शिर्डीत मोठा भक्त परिवार होता. त्यामुळे त्याचे सर्वाधिक आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार तिथंच सुरू असायचे. तो अनेक भक्तांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीत भागीदार असल्याचं देखील पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान, अशोक खरातचे आर्थिक व्यवहार, गैरव्यवहार किंवा मनी लाँड्रिंगसारखे कोणतेही धागेदोरे आढळल्यास त्यावरही कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 2:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय खोलात! प्रकरणात ED च्या एन्ट्रीनंतर आणखी एक धक्का






