जागा दिल्या की चेष्टा केली, पुण्यात भाजपकडून RPI ची बोळवण, आठवलेंचे कार्यकर्ते आक्रमक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) भाजपवर प्रचंड नाराज झाली आहे. कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी महायुतीत वादाची ठिणगी पडत आहे. पुण्यातही महायुतीत वितुष्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) भाजपवर प्रचंड नाराज झाली आहे. आता आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. भाजपने आरपीआयला अत्यंत कमी जागा दिल्या. ज्या जागा दिल्या तिथे त्यांचेच उमेदवार दिल्याचा खळबळजनक आरोप आरपीआयने केला आहे.
नेमकं वादाचं कारण काय?
पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने आरपीआयला महायुतीत ९ जागा सोडल्या आहेत. मात्र, या ९ जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवरून हा सर्व वाद पेटला आहे. या ९ जागांपैकी केवळ २ उमेदवार हे मूळ आरपीआयचे कार्यकर्ते आहेत. उर्वरित ७ उमेदवार हे भाजपचेच आहेत, ज्यांना आरपीआयच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
"आमच्या जागा, पण उमेदवार भाजपचेच"
"भाजपने आरपीआयला जागा तर दिल्या, पण तिथेही आपलेच लोक उभे करून आरपीआयच्या अस्तित्वावर घाला घातला आहे," अशी भावना आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आहे. आपल्या हक्काच्या जागांवर भाजपचे डमी उमेदवार चालणार नाहीत, अशी भूमिका घेत आरपीआय आता भाजपच्या शहर कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
खरं तर, मागील काही काळापासून आरपीआयची महायुतीत कोंडी होत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नव्हती. रामदास आठवले यांनी महायुतीत आपल्याला किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. पण त्यांना एकही जागा देण्यात आली नाही. अशीच स्थिती विधानसभेला देखील बघायला मिळाली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरी आरपीआयचा सन्मान राखला जाईल, अशी अपेक्षा होती. पण अनेक ठिकाणी आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी उपेक्षाच आल्याचं दिसून येत आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर रामदास आठवले नक्की काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जागा दिल्या की चेष्टा केली, पुण्यात भाजपकडून RPI ची बोळवण, आठवलेंचे कार्यकर्ते आक्रमक









