पुण्यात 'माया टोळी'च्या नंबरकारींचा धुडगूस, तरुणांवर कोयत्याने हल्ले, तीन आरोपींची नावं समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Maya Gang: पुण्यातल्या कोंढवा भागातील खडी मशीन चौकात गणेश काळे याचा खून होऊन तीन दिवस उलटले नसताना पुण्यात बाजीराव रस्त्यावर तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : आंदेकर आणि कोमकर टोळीच्या सदस्यांना गजाआड करून पुणे पोलिसांनी आत्ता कुठे सुटकेचा निश्वास टाकला होता तोच शहरात नव्याने उदयास आलेल्या 'माया टोळी'च्या सदस्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. पुण्यातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या तरुणालाही दुखापत झाली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे कळते आहे.
पुण्यातल्या कोंढवा भागातील खडी मशीन चौकात गणेश काळे याचा खून होऊन तीन दिवस उलटले नसताना पुण्यात बाजीराव रस्त्यावर तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजीराव रस्त्यावरील घटना कळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.
advertisement
माया टोळीच्या नंबरकारींचा धुडगूस
पुणे शहरात नव्याने उदयास आलेल्या माया टोळीतील सदस्यांनी बाजीराव रस्त्यावर रक्तरंजित थरार घडवून आणल्याचे सांगितले जाते. टोळीचा म्होरक्या अभिजीत पाटील याने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अभिजीत पाटील याला गुन्हेगारी वर्तुळात 'माया' या नावाने संबोधतात. किंबहुना माया नावानेच त्याला ओळखले जाते. माया टोळीत अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे हे सदस्य आहेत. अमन आणि अक्षय हे दोघेही बाजीराव रस्त्यावरील हल्ला प्रकरणात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
advertisement
माया टोळीचा म्होरक्या अभिजीत पाटील याचा गुन्हेगारी इतिहास
अभिजीत पाटील हा माया टोळीचा म्होरक्या आहे. सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. अतिशय तरुण वयात अभिजीत उर्फ मायाने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. अभिजीत हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर गंभीर मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल आहेत.
advertisement
नेमकी घटना काय, कशी घडली?
पुण्यात बाजीराव रस्त्यावरून तीन जण दुचाकीवरून जात होते. मागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणांवर कोयत्याने वार केले. त्यांच्या हल्ल्यात मयंक खराडे अतिशय गंभीर जखमी झाला. मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुचाकीवरील दुसरा तरुणही जखमी झाला आहे. मयंक खराडे याची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव अभिजीत इंगळे असे आहे.
view commentsLocation :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
Nov 04, 2025 5:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात 'माया टोळी'च्या नंबरकारींचा धुडगूस, तरुणांवर कोयत्याने हल्ले, तीन आरोपींची नावं समोर










