सात महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली सेफ्टी पिन, महिन्याभरानंतर समोर आली धक्कादायक बाब; डॉक्टर म्हणाले...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बाळाच्या घशात एक उघडी सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगितले.
चिपळूण: लहान मुलांच्या बाबतीत पालकांचा एक क्षणाचा हलगर्जीपणा किती जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय दापोली येथील एका घटनेवरून आला आहे. एका सात महिन्यांच्या बाळाला गेल्या महिनाभरापासून सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. मात्र, साध्या वाटणाऱ्या या त्रासामागे चक्क घशात अडकलेली 'सेफ्टी पिन' असल्याचे समोर आले. वालावलकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून या बाळाला नवे आयुष्य दिले आहे.
महिना झाला तरी बाळाला सर्दी - खोकल्याचा त्रास होत होता. औषधोपचार केला तरी बाळाचा त्रास कमी होत नसल्याने पालकांनी दापोलीतील बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला असता, बाळाच्या घशात एक उघडी सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी बाळाला तातडीने वालावलकर रुग्णालयात नेण्यास सांगितले.
कशी काढली सेफ्टी पिन बाहेर?
advertisement
रुग्णालयात पोहोचताच कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. सीजा यांनी प्राथमिक तपासणी केली. क्षणाचाही विलंब न लावता बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, आधी घशात दिसणारी ही पिन आता अन्ननलिकेपर्यंत खाली सरकली होती. सर्वात मोठी भीती ही होती की, सेफ्टी पिन उघडी असल्यामुळे ती अन्ननलिकेला छिद्र पाडू शकत होती, जे बाळाच्या जिवासाठी अत्यंत घातक ठरू शकले असते. मात्र, तज्ज्ञ डॉ. राजीव यांनी 'ईसोफॅगोस्कोपी' (Esophagoscopy) या प्रक्रियेद्वारे अत्यंत कौशल्याने ती पिन बाहेर काढली. सात महिन्यांच्या लहान बाळाला भूल देणे हे सर्वात मोठे आव्हान होते, जे रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञांनी यशस्वीरीत्या पेलले.
advertisement
बाळाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले
शस्त्रक्रियेनंतर बाळाला रुग्णालयातील अद्ययावत बालरोग अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, जिथे त्याची रिकव्हरी जलद गतीने झाली. कान-नाक-घसा तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे वालावलकर रुग्णालय कोकणातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. अन्ननलिकेत अडकलेली उघडी सेफ्टी पिन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढून डॉक्टरांनी या बाळाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे.
advertisement
लहान मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्प्रिंग्ज, नाणी, पिना किंवा लहान खेळण्यांचे भाग यासारख्या वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. चुकून असा काही प्रकार घडला तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सात महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली सेफ्टी पिन, महिन्याभरानंतर समोर आली धक्कादायक बाब; डॉक्टर म्हणाले...






