साखरपुड्याच्या मेहंदीचा रंग उतरण्याआधीच काळाचा घाला! धाराशिवमध्ये Tata Nexon चा भीषण अपघात,अक्षय आणि अक्षयाचा जागेवर मृत्यू
- Reported by:BALAJI NIRFAL
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Dharashiv Accident: विवाहाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांसह संपूर्ण वाशी तालुका हादरून गेला आहे.
वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (वय 23) अशी अपघातात मृत्यू झालेल्या नववधू-वरांची नावे आहेत. दोघांचा अवघ्या चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. विवाहाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेशनची परीक्षेसाठी दोघे टाटा नेक्सॉन कारने लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार थेट टोलवेच्या कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला. अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
advertisement
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अवघ्या काही दिवसांपूर्वी आनंदात न्हाऊन निघालेल्या दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण तपासण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साखरपुड्याच्या मेहंदीचा रंग उतरण्याआधीच काळाचा घाला! धाराशिवमध्ये Tata Nexon चा भीषण अपघात,अक्षय आणि अक्षयाचा जागेवर मृत्यू








