Success Story : नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात, VIdeo
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
संकटाचे रूपांतर संधीत कसे करावे, याचे उत्तम उदाहरण नाशिकच्या दोन सख्ख्या भावांनी समाजासमोर ठेवले आहे.
नाशिक: संकटाचे रूपांतर संधीत कसे करावे, याचे उत्तम उदाहरण नाशिकच्या दोन सख्ख्या भावांनी समाजासमोर ठेवले आहे. कोरोना काळात हातातली नोकरी गेल्यानंतर खचून न जाता, शरद शिलावट आणि समाधान शिलावट या दोन तरुणांनी सुरू केलेला नाशिक अंडा रोल वाला हा व्यवसाय आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. यामधून त्यांची महिन्याची उलाढाल आता लाखाच्या घरात आहे.
संघर्षातून उभा राहिला पाया
कोरोना महामारीपूर्वी शरद आणि समाधान हे दोघेही कंपनीत कामाला होते. मात्र, टाळेबंदीत नोकरी सुटल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. शरद यांनी घराचा गाडा हाकण्यासाठी रिक्षा चालवण्यापासून ते हॉटेलमध्ये आचारी म्हणूनही काम केले. दरम्यान, समाधान यांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले होते, पण परिस्थितीमुळे त्यांनीही भावाला साथ देण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमधील अनुभवामुळे शरद यांना खाद्यपदार्थांची आवड निर्माण झाली होती, त्यातूनच अंडा रोल विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली.
advertisement
Unique machine : 16 वर्षांच्या दिनेशची कमाल, शेतीच्या कामासाठी बनवले अनोखे मशीन, 7 कामे होणार, Video
संकटांची मालिका आणि जिद्द
सुरुवातीला घरापासून सुरू केलेला हा प्रवास सोपा नव्हता. लॉकडाऊननंतर त्यांनी रस्त्यावर छोटा गाडा सुरू केला, पण आर्थिक अडचणींमुळे तो काही काळ बंद पडला. अनेक संकटे आली, पण शिलावट बंधूंनी हार मानली नाही. जिद्दीने पुन्हा उभे राहत त्यांनी ग्राहकांच्या जिभेवर आपल्या चवीची जादू चढवली. एका छोट्या गाड्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज भव्य स्वरूपात पाहायला मिळतोय.
advertisement
3 फूड व्हॅनचा विस्तार
सध्या त्यांचे दोन फूड ट्रक नाशिकमध्ये यशस्वीपणे सुरू असून, तिसरी फूड व्हॅन लवकरच नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कष्ट आणि चवीच्या जोरावर हे दोन्ही भाऊ आज महिन्याला लाखात कमाई करत आहेत. रोजगार निर्मिती एकेकाळी स्वतःची नोकरी गमावलेले हे तरुण आज अनेक हातांना रोजगार देत आहेत.
परिस्थितीमुळे आम्ही शांत बसलो नाही. हॉटेलमधील कामाचा अनुभव गाठीशी होता, त्याचाच उपयोग करून आम्ही नाशिकमध्ये अंडा रोल सुरू केला. आज लोक आमच्या चवीला पसंती देत आहेत, याचे समाधान वाटते, असे शिलावट बंधूंनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर शून्यातून विश्व निर्माण करता येते, हेच शरद आणि समाधान शिलावट यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 1:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात, VIdeo









