Malad Hit and Run: रुग्णालयात नेलं असतं तर माझा लेक वाचला असता; लग्नाच्या 20 वर्षानंतर झाला होता मुलगा, पित्याचा हृदयद्रावक आक्रोश
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tragic Hit And Run In Mumbai: मालाडमध्ये भरधाव इनोव्हा कारने चार वर्षांच्या चिमुकल्याचा चिरडून जीव घेतल्याने मुंबई हादरली आहे. 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आरोपी फरार झाल्याने संताप उसळला आहे.
मुंबई: मुंबईच्या मालाड परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलाला चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत्यू झालेला हा चिमुकला आई-वडिलांच्या लग्नानंतर तब्बल 20 वर्षांनी जन्माला आलेला एकमेव मुलगा होता.
घटनेचा CCTV व्हिडीओ समोर
या भीषण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, चार वर्षांच्या चिमुकल्याला चिरडल्यानंतर कार काही क्षण थांबते. त्यानंतर चालक सोसायटीतील वॉचमनला घटनेची माहिती देतो. काही वेळाने वॉचमन त्या जखमी मुलाला उचलून नेताना दिसतो. मात्र मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे या फुटेजमधून स्पष्ट होते.
advertisement
लग्नसोहळ्याच्या आनंदावर दुःखाचा डोंगर
मालाड पूर्व येथील निलोय विराट इमारतीत राहणाऱ्या सिंग कुटुंबात 5 फेब्रुवारी रोजी लग्नाचा सोहळा होता. संपूर्ण कुटुंब आनंदात सहभागी झाले होते. मात्र 7 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास चार वर्षांचा लक्ष इमारतीखाली खेळत असताना काळ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार भरधाव वेगाने आली आणि त्याला चिरडून गेली. अपघातानंतर चालकाने वॉचमनला माहिती दिली आणि लगेचच फरार झाला.
advertisement
...तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता
मृत मुलाचे वडील जयप्रकाश सिंग यांनी सांगितले की, 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमचा मुलगा जन्माला आला होता. तो आमचा एकमेव आधार होता. जर अपघातानंतर कारचालकाने माझ्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले असते, तर कदाचित आज तो जिवंत असता, अशी हृदयद्रावक भावना त्यांनी व्यक्त केली.
जयप्रकाश सिंग यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला तात्काळ हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले आणि पोलिस कोठडीची मागणीही करण्यात आली नाही. आरोपीला जामीन देण्याची तयारी सुरू होती. हे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन तीव्र आंदोलन केलं, तेव्हाच जामीन रोखण्यात आला.
advertisement
अपघातानंतर मुलाला घसीटल्याचाही आरोप
कुटुंबीयांनी या प्रकरणात हिट अँड रन अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अपघातानंतर आरोपीने मुलाला फरफरटत नेल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये सोसायटीचा गार्ड जखमी मुलाला गोदात उचलून नेताना दिसत आहे.
पोलिसांची माहिती
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी FIR दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रमेश देवजी जतरारा असे असून, तो संबंधित सोसायटीच्या पार्किंगमध्ये केवळ वाहन पार्क करतो, तर तो प्रत्यक्षात इतरत्र राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 4:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Malad Hit and Run: रुग्णालयात नेलं असतं तर माझा लेक वाचला असता; लग्नाच्या 20 वर्षानंतर झाला होता मुलगा, पित्याचा हृदयद्रावक आक्रोश





