Mumbai Local: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेचं प्लॅनिंग, मुंबईत मध्यरात्रीनंतर धावणार ट्रेन, शेवटची लोकल कधी?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एकूण 12 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.
मुंबई: मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाट्या आणि विविध सार्वजनिक ठिकाणी नववर्षाचे स्वागत करणाऱ्या नागरिकांसाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एकूण 12 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नववर्ष साजरे करून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
मध्यरात्रीच्या प्रवासादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा दल (RPF), लोहमार्ग पोलीस (GRP), महाराष्ट्र सुरक्षा दल तसेच होमगार्ड यांचे अतिरिक्त पथक स्थानकांवर आणि लोकल गाड्यांमध्ये तैनात राहणार आहे. विशेषतः सीएसएमटी, दादर, चर्चगेट, मरीन लाईन्स, गिरगाव या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने येथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि कल्याण ते सीएसएमटी दरम्यान दोन विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. या लोकल गाड्या मध्यरात्री 1.30 वाजता सीएसएमटी ते कल्याण तसेच 1.30 वाजताच कल्याण ते सीएसएमटी मार्गावर धावतील.
advertisement
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी अशा दोन विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या दोन्ही लोकल गाड्यांची वेळ मध्यरात्री १.३० वाजता निश्चित करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचा खास प्लॅन
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान एकूण चार विशेष लोकल फेऱ्या धावणार असून, त्या मध्यरात्री 1.15 2.00, 2.30 आणि 3.25 वाजता सुटतील. त्याचप्रमाणे विरार ते चर्चगेट दरम्यानही चार विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असून त्या मध्यरात्री 12.15, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता रवाना होतील.
advertisement
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे, गर्दी टाळण्यासाठी शिस्त पाळण्याचे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नववर्षाच्या आनंदात सहभागी होताना सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी या विशेष लोकल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेचं प्लॅनिंग, मुंबईत मध्यरात्रीनंतर धावणार ट्रेन, शेवटची लोकल कधी?









