Mumbai News: नेमकं काय घडलं? वाडिया रुग्णालयात 9 अर्भकांचा मृत्यू, पालकांचे गंभीर आरोप
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या प्रकृतीची गंभीर माहिती त्याच्या पालकांना रात्री २ किंवा ३ वाजता अचानक बोलवून दिली जाते
मुंबई : परळ येथील सुप्रसिद्ध वाडिया रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) गेल्या दोन आठवड्यांमध्ये (१४ दिवसांत) तब्बल नऊ अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूंचे कारण जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असा दावा मृतांच्या पालकांनी केला आहे.
वाडिया रुग्णालयात प्रसूती आणि नवजात बालकांसाठी अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. तरीही, या १५ दिवसांच्या कालावधीत नऊ अर्भकांना जीव गमवावा लागला. या अर्भकांवर २० ते २५ दिवस उपचार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने पालकांकडून जवळपास ४ ते ५ लाख रुपये शुल्क वसूल केले, अशी माहिती पालकांनी दिली. मृत्यू झालेल्या सर्व बालकांना संसर्ग झाल्यामुळे त्यांचा अंत झाला, असे डॉक्टरांकडून पालकांना सांगण्यात आले.
advertisement
शीव येथील एका रहिवासी महिलेची प्रसूती ६ नोव्हेंबर रोजी वाडिया रुग्णालयात झाली. सातव्या महिन्यातच बाळ जन्मल्यामुळे त्याला NICU मध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी पालकांना समुपदेशन करताना सांगितले होते की, बाळाची प्रकृती सुधारण्यासाठी किमान एक ते दोन महिने लागतील आणि त्यासाठी अंदाजे सात ते आठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, महिनाभरानंतर, मध्यरात्री ३ वाजता डॉक्टरांनी पालकांना कळवले की बाळाला संसर्ग झाला आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि त्याच्या छातीत पाणी जमा झाले आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी बाळाचा मृत्यू झाला. या दरम्यान, रुग्णालयाचे ५ लाख रुपये देयक आणि औषधांवर जवळपास १ लाख ८० हजार रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे पालकांनी सांगितले.
advertisement
अपरात्री संमतीपत्रे आणि औषधांची मागणी
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या प्रकृतीची गंभीर माहिती त्याच्या पालकांना रात्री २ किंवा ३ वाजता अचानक बोलवून दिली जाते. ही माहिती देण्यापूर्वी, बाळाची प्रकृती गंभीर असून त्याला विशिष्ट इंजेक्शन द्यायचे आहे असे सांगून त्यांच्याकडून संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली जाते. तसेच, रुग्णालयात रक्त किंवा प्लेटलेट्स उपलब्ध नसल्याने तातडीने बाहेरून आणण्यासही रात्रीच्या वेळीच सांगण्यात येते, असे नातेवाईकांनी सांगितले.
advertisement
शीव रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी या संदर्भात मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्या बाळांना NICU मध्ये ठेवण्याची वेळ येते, त्यांची प्रकृती मुळातच गंभीर असते. बाळांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. प्रसूती मुदतपूर्व झाल्यास त्यांना ‘रेफ्रेक्ट्री सेप्टिक शॉक’हा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिजैविके (Antibiotics) दिली जातात, परंतु जर नियमित औषधांनी संसर्ग नियंत्रित झाला नाही, तर बालकाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
advertisement
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, "अखेरच्या क्षणाला गुंतागुंत असलेली प्रकरणे आमच्याकडे येतात. NICU मध्ये कोणतीही समस्या नाही." डॉक्टरांनी नातेवाईकांना संसर्गामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असेल, तर त्याबद्दल मला डॉक्टरांशी बोलावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: नेमकं काय घडलं? वाडिया रुग्णालयात 9 अर्भकांचा मृत्यू, पालकांचे गंभीर आरोप










