Pune Traffic: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच खुली होणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
या निर्णयामुळे गणेशखिंड रस्त्यावरील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या डबल डेकर उड्डाणपुलाच्या औंध ते शिवाजीनगर दिशेच्या एका बाजूचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ही बाजू 20 ऑगस्टपर्यंत किंवा ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. या निर्णयामुळे गणेशखिंड रस्त्यावरील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.
हा डबल डेकर पूल खास आहे कारण तो एकाच वेळी मेट्रो आणि वाहनांची वाहतूक सुलभ करणार आहे. पुणे महानगर परिवहन विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकडेवारीनुसार, एकूण काम 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित कामे ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
औंध ते शिवाजीनगर बाजूवरील रस्ता डांबरीकरणासह पूर्ण करण्यात आला असून, वाहतूक नियम दर्शविणाऱ्या पट्ट्यांची आखणीही झाली आहे. शिवाजीनगर आणि औंध बाजूच्या रॅम्पचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असून, या बाजूवरील प्रवास सुरळीत होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. बाणेर आणि पाषाण बाजूच्या उर्वरित रॅम्पचे काम मात्र ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने एका बाजूचे काम पूर्ण होताच ती त्वरित प्रवासी आणि वाहनचालकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्यावर दीर्घकाळ चालत आलेल्या वाहतूक कोंडीचे निराकरण करण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये विद्यमान दोन एकेरी उड्डाणपूल पाडण्यात आले. त्यानंतर, पुणे महानगरपालिका आणि पुणे युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (पुमटा) यांनी एकात्मिक डबल डेकर फ्लायओव्हर प्रकल्पाला मंजुरी दिली.
advertisement
उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार गणेशखिंड रस्ता 45 मीटरपर्यंत रुंद करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहनवाहतुकीचा ताण सांभाळता येईल.
औंध, बाणेर, पाषाण आणि हिंजवडीकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर पुण्यातील या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून, शहराच्या वाहतूक व्यवस्थापनात एक महत्त्वाची पायरी गाठली जाईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 12, 2025 8:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच खुली होणार