पुण्यात चाललंय काय? ससूनमध्ये रक्तरंजित थरार; उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर धारदार शस्त्राने सपासप वार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला होता. "पोलिसांना फोन का केला?" याच रागातून आरोपी शफाक शेख आणि त्याच्या साथीदारांनी अस्लम खान यांना मारहाण केली.
पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात दोन गटांत लागलेली भांडणाची ठिणगी थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचली असून, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे.
या वादाची सुरुवात ३ फेब्रुवारी रोजी कौसरबाग परिसरात झाली. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला होता. "पोलिसांना फोन का केला?" याच रागातून आरोपी शफाक शेख आणि त्याच्या साथीदारांनी अस्लम खान यांना लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली.
ससून रुग्णालयात रक्ताचा सडा
मारहाणीत जखमी झालेल्या अस्लम खान यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ सलीम आणि पुतण्या अब्दुल समद तेथे आले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग करत थेट ससूनच्या गेटवरच हल्ला चढवला. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात अस्लम, सलीम आणि अब्दुल हे तिघेही गंभीर जखमी झाले. भरवस्तीत आणि रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
१८ जणांविरुद्ध गुन्हा, ३ अटकेत
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन्ही गटांच्या १८ ते २० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शफाक शेख, शहबाज खान आणि दुसऱ्या गटातील मोहम्मद जिब्रान सय्यद यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 10:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात चाललंय काय? ससूनमध्ये रक्तरंजित थरार; उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर धारदार शस्त्राने सपासप वार







