आता ट्रॅफिक आणि गर्दीला मारा 'कट'! थेट मेट्रो स्टेशनमध्ये एन्ट्री; स्वारगेटसह 3 महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांसाठी खास प्रवेशद्वारं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावा, या दृष्टीने महामेट्रोनं शहरांतील तीन प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक अतिशय सुखद बातमी आहे. मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावा, या दृष्टीने महामेट्रोनं शहरांतील तीन प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फेब्रुवारी पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट या स्थानकांवरून प्रवाशांना नवीन मार्गाने ये-जा करता येईल.
स्वारगेट: एसटी स्थानकावरून थेट मेट्रोमध्ये एन्ट्री!
स्वारगेट मेट्रो स्थानकावर प्रवेशद्वार क्रमांक ५ अखेर सुरू होत आहे. एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांची ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आता प्रवाशांना वर्दळीचा रस्ता न ओलांडता थेट एसटी स्टँडच्या बाजूने भुयारी मार्गाने मेट्रोमध्ये प्रवेश मिळेल. यामुळे जेधे चौकातील वाहतूक कोंडी आणि रस्ता ओलांडण्याचा जीवघेणा धोका कायमचा टळणार आहे.
advertisement
शिवाजीनगर: शिमला ऑफिस चौकातून भुयारी मार्ग
शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक ३ आता आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौकात सुरू होत आहे. यामुळे गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मुख्य रस्ता ओलांडण्याची गरज उरणार नाही. सुरक्षित भुयारी मार्गामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
advertisement
पिंपरी-चिंचवड: हायवे ओलांडण्यापासून सुटका
पिंपरी-चिंचवड मनपा स्थानकावर प्रवेशद्वार क्रमांक ३ हे पुणे-मुंबई महामार्गावर (मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर) सुरू करण्यात येत आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या किंवा पिंपरी महापालिकेत जाणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्याची कसरत आता करावी लागणार नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आता ट्रॅफिक आणि गर्दीला मारा 'कट'! थेट मेट्रो स्टेशनमध्ये एन्ट्री; स्वारगेटसह 3 महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांसाठी खास प्रवेशद्वारं






