..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील वर्धा नागपूर मार्गावर असणारं गाढवभुकी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. या देवीच्या नावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.
वर्धा, 8 ऑक्टोबर: येत्या काही दिवसांत शक्तीची उपासना करणारा नवरात्री उत्सव सुरू होत आहे. या काळात विवध स्त्री देवतांची पूजा केली जाते. प्रत्येक भागातील या देवतांची वेगवेगळी नावे आणि त्यामागे काही खास आख्यायिका असतात. अशीच एक प्रसिद्ध देवी वर्धा नागपूर मार्गावर आहे. गाढवभुकी माता म्हणून हे मंदिर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या देवीच्या मंदिराचा इतिहास खूप जुना असून देवीच्या नावाबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात.
विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी मातेचं मंदिर वर्धा नागपूर मार्गावर आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असणाऱ्या सावंगी(आसोला) येथे हे मंदिर आहे. या मंदिराची ख्याती संपूर्ण विदर्भात आहे. वर्ध्यापासून 35 ते 40 आणि नागपूरपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. गाढवभुकी देवीचं मंदिर अगदी रस्त्याच्या कडेला आहे. या मंदिराबाबत काही आख्यायिका असून सावंगी(आसोला) गावचे सरपंच आणि गाढवभुकी माता देवस्थानचे अध्यक्ष शेषराव नागमोते यांनी याबाबत माहिती दिलीय.
advertisement
काय आहे आख्यायिका ?
गाढवभुकी देवीबाबत आख्यायिका अंदाजे 150 वर्षांपूर्वीची आहे. याठिकाणी विठोबा काशिनाथ नागमोते यांचं शेत होतं. हा परिसर म्हणजे कोलाम लोकांची वस्ती होती. त्याकाळात हैजा नावाच्या एका महामारीचं संकट होतं. गावकऱ्यांवर कोणतंही संकट आलं की येथील देवी गाढवासारखी ओरडायची. त्यामुळे गावकऱ्यांना संकटाची चाहुल लागायची. यावरून या देवीचं नाव गाढवभुकी माता असं पडल्याचं गावकरी सांगतात.
advertisement
अशी झाली भक्तीची सुरवात
अगदी सुरवातीच्या काळात याठिकाणी जाणवणाऱ्या विशिष्ट ऊर्जेमुळे शेतातील खुल्या परिसरात दगडांवर शेंदूर लावून पूजा होऊ लागली. काही वर्षांनी या शेतात खोदकाम झालं आणि याच ठिकाणून या देवीची मूर्ती सापडली. त्याठिकाणी रिठा आणि कडुनिंबाचं झाड होतं, असं सांगितले जाते. या मूर्तीवर 4 मुखवटे असून त्याकाळातील ही मूर्ती जशीच्या तशीच आहे.
advertisement
तेव्हा बांधलं देवीचं मंदिर
अंदाजे 35-38 वर्षांपूर्वी तिवारी महाराज म्हणून वर्धा येथील गृहस्थ होते. ते वर्धा- नागपूर मार्गाने स्वतःच्या ट्रकने प्रवास करत असताना त्यांची ट्रक या मंदिराजवळच बंद पडला. वाहन काही केल्या सुरू होईना. ते खाली उतरले तेव्हा त्यांना झाडाखाली देवी दिसली. तिथे देवीच्या चरणी ते नतमस्तक झाले. ट्रक सुरू होऊ दे, मी मंदिर उभं करीन असा नवस बोलले. त्यानंतर गाडी सुरू झाली. आणि ते आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते परत आले आणि गणपतराव नागमोते यांच्याशी चर्चा करून त्यांच्याच सहकार्याने त्यांनी नवस फेडण्यासाठी हे मंदिर उभं केलं. तेव्हापासून मातेची मूर्ती ही मंदिरात विराजमान आहे, अशी माहिती अध्यक्ष नागमोते देतात.
advertisement
शासकीय निधीअभावी विकास नाही
सध्या गणपतराव नागमोते यांचे पुत्र शेषराव नागमोते हे या मंदिराचे अध्यक्ष आहेत. सर्व गावकरी मिळून मंदिराचं काम पाहतायेत. 30 वर्षांपासून नागमोते सावंगी(आसोला) गावचे सरपंच आहेत. गाढवभुकी मातेच्या दर्शनासाठी सर्व धर्मातील लोक या ठिकाणी भेट देतात. मागणी केल्यानंतरही मंदिर विकासासाठी शासकीय निधी उपलब्ध न झाल्यामुळे मंदिराचा फारसा विकास होऊ शकला नाही, असं अध्यक्ष सांगतात. मंदिर अगदी साधं आहे तरीही अंदाजे दीडशे वर्षांचा इतिहास असलेलं गाढवभुकी माता मंदिर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासह अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
October 08, 2023 10:56 AM IST
मराठी बातम्या/Temples/
..तेव्हा गाढवासारखं ओरडायची देवी, विदर्भातील प्रसिद्ध गाढवभुकी माता माहितीये का? Video

