शेतकऱ्यांना पावसाची गरज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, अजूनही अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, धाराशिव आणि अन्य मराठवाड्यातील जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतही पावसाचा प्रभाव जाणवेल. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
मुंबईत ढगाळ वातावरण
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहील. शहरात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी
मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतीला पाण्याचा तुटवडा जाणवत असून, शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढू शकतो. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे कामही गती घेईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याने नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले आहेत. सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे शेती आणि जलसाठ्यांवर सकारात्मक परिणाम होण्याची आशा आहे. मात्र, पुढील काही दिवस हवामानाची सतत निरीक्षणे ठेवणे गरजेचे असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
