पुणे : राज्यात सध्या परतीच्या मॉन्सूनची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. हवामान विभागाने आज (17 सप्टेंबर) राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान परिस्थिती
दक्षिण कर्नाटकपासून कोमोरोन परिसरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विदर्भावर समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पावसाला अनुकूल वातावरण आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासांत जालना जिल्ह्यात तब्बल 120 मिमी, तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली.
कुठे कोणता अलर्ट?
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू केला आहे. 14 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून माघार सुरू झाली असून, 26 सप्टेंबर रोजी राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. सध्या परतीची सीमा भटिंडा, फतेहाबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भूजपर्यंत पोहोचली आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यांसारख्या पिकांबरोबरच भाजीपाल्यावरही रोग व कीड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना कराव्यात.
सोयाबीन व डाळीचे पिके
पाने पिवळसर होणे, पानगळ, मुळकुज यावर नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब यांचे मिश्रण फवारावे. अळींच्या प्रादुर्भावासाठी स्पिनोसॅड किंवा एमामेक्टिन बेन्झोएट यांचा वापर करावा.
कापूस
लाल कोळी किंवा रसशोषक किडीवर नियंत्रणासाठी अॅसेफेट किंवा थायोमेथॉक्साम यांचे फवारे करावेत. पांढरी माशी वाढू लागल्यास इमिडाक्लोप्रिड यासारखी औषधे फवारावीत.
तूर व उडीद
पानांवरील डाग व करपा रोगावर मॅन्कोझेब फवारणी करावी. अळ्यांवर नियंत्रणासाठी क्विनालफॉस किंवा क्लोरपायरीफॉस वापरावे.
भाजीपाला पिके (टोमॅटो, वांगी, भोपळा, मिरची)
पानांवरील डाग व करपा रोगासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा झायनेब यांचा वापर करावा. फळ व पानांवर अळ्या दिसल्यास स्पिनोसॅड फवारावे.