PSI Success Story: बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे केली ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं अन् झाला फौजदार, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
MPSC Success Story: ड्रायव्हर म्हणून काम करत असतानाच त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. काम करत करत पुढे शिक्षण सुरू ठेवलं.
पुणे: जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात काहीही अशक्य नसते, हे बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आलेल्या शुभम साबळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये खाकी वर्दीचे स्वप्न साकार करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्यांच्या याच यशाबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातून स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या शुभम साबळे यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. बारावीमध्ये ते दोन वेळा नापास झाले होते. त्यानंतर त्यांनी सात वर्षे ड्रायव्हिंगची नोकरी केली. ड्रायव्हिंग करत असतानाच त्यांनी एमपीएससीची तयारी सुरू केली. कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी अखेर यश संपादित केले आहे.
advertisement
ड्रायव्हिंग करत घेतले शिक्षण
शुभम सांगतो की, “त्यांच्या भागात शिक्षणाला फारसे महत्त्व नसल्याने लहानपणी अभ्यासाकडे विशेष लक्ष नव्हते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत दोन वेळा नापास झाला. बारावी नापास झाल्यानंतर घरच्यांनी पुढील शिक्षणाचा दाखला काढला आणि आता काम करून पैसे कमव, असे सांगितले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे ड्रायव्हिंगची नोकरी सुरू केली. ड्रायव्हर म्हणून काम करत असतानाच त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. काम करत करत पुढे शिक्षण सुरू ठेवले आणि बीएससी केमिस्ट्रीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
ड्रायव्हर ते PSI पदापर्यंतचा प्रवास
बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या भागात काही जण अधिकारी झाल्याचे पाहिले. त्यांना पाहून आपणही काहीतरी मोठे करावे, अधिकारी व्हावे असा निर्धार केला. माझ्या या निर्णयाला कुटुंबीयांनी देखील पाठिंबा दिला. तेथूनच स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात झाली. 2022 साली ते पुण्यात आले आणि अभ्यास सुरू केला, असे शुभम सांगतो.
या प्रवासात त्यांना दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर एमपीएससीमध्ये 173 वी रँक मिळवत पीएसआय पदापर्यंत मजल मारली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावे, असा सल्ला शुभम यांनी दिला आहे. सातत्याने अभ्यास करत राहिल्यास यश नक्की मिळते, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 10:58 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
PSI Success Story: बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे केली ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं अन् झाला फौजदार, Video







