हवामान स्थिती
सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून उपसागरापर्यंत सक्रीय आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून जवळपास 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्या भागात नव्याने कमी दाब क्षेत्र तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसाचा जोर काही भागात वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यभर पावसाचा जोर ओसरला होता, त्यामुळे तुरळक ठिकाणीच हलक्या ते मध्यम सरी पडत होत्या. उघड्या भागात उन्हाचा चटका व उकाडा वाढला होता. सोमवारी (1 सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी सुरु झाल्या. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 33.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
advertisement
कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट – चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली, नांदेड, गोंदिया.
येलो अलर्ट - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
सध्या खरीप पिके अर्ध्या वाढीच्या टप्प्यात आहेत. पावसामुळे आर्द्रता जास्त असल्याने बुरशीजन्य रोग व कीड वाढण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील फवारण्या करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे :
तांदूळ व सोयाबीन पिके – पानांवर करपा, कूज किंवा डाग रोग दिसल्यास मॅन्कोझेब किंवा ट्रायकोडर्मा आधारित बुरशीनाशकाची फवारणी करावी.
कापूस – गुलाबी बोंड अळी, तुडतुडे व रसशोषक किडीवर नियंत्रणासाठी कीटकनाशकांची (इमिडाक्लोप्रिड, थायोमेथॉक्साम यासारखी) शिफारसीय प्रमाणात फवारणी करावी.
मका – डाग रोग व आर्मीवर्म यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब मिश्रित बुरशीनाशकाचा वापर करावा.
डाळी व तूर – कीड व पानांवर बुरशीजन्य लक्षणे दिसल्यास फवारणीबरोबरच शेतातील निचरा व्यवस्थित ठेवावा.
दरम्यान, पावसाचा जोर काही भागात वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून योग्य वेळी बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे आहे. पिकांचा बचाव आणि उत्पादनात घट होऊ नये यासाठी वेळेवर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.