हनुमानच्या घरी एक एकर शेती आहे. या शेतीत तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांची लागवड करतो. शेतीच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा तो आधुनिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करतो. त्याच्या प्रयत्नामुळे झेंडूच्या एकाच सीझनमध्ये त्याला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई झाली आहे. हनुमान आपल्या शेतीमध्ये भाज्या, फळे आणि इतर चांगलं उत्पन्न देणारी पिकं लावतो.
advertisement
हनुमान वानखेडेने सांगितलं की, शेती हा केवळ व्यवसाय नसून ते एक विज्ञान आहे. त्यासाठी योग्य ज्ञान आणि मेहनत लागते. हनुमान आत्मविश्वासाने इतर स्थानिक शेतकर्यांना देखील आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देतो. स्वतःचा व्यवसाय वाढवत असताना गावातील इतर शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा, अशी त्याची इच्छा आहे.
हनुमानच्या यशोगाथेमुळे टालेवाडी गावातील तरुण पिढीमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. शेती करण्यात काही अर्थ उरला नाही, असं मानणाऱ्या अनेकांना हनुमानने आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. त्याच्या गावातील अनेक शेतकरी त्याच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या नवीन पद्धती अवलंबण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे गावातील शेतीत मोठा बदल दिसून येत आहे. हनुमान म्हणाला, "शेती फक्त परंपरेवर नाही तर विज्ञानावर आधारित असायला हवी. नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे."