मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेने रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 दरम्यान 114.6 मिमी पावसाची नोंद केली, तर कुलाबा वेधशाळेवर फक्त 11.2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात उपनगरांमध्ये विशेषतः विलेपार्ले आणि सांताक्रूझ परिसरात 90 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात (सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30) सांताक्रूझमध्ये 87 मिमी, तर कुलाबात फक्त 8 मिमी पाऊस पडल्याचे नोंदवण्यात आले.
advertisement
दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार
मुंबईसह कोकणातही पावसाची स्थिती सुधारली असून, अलिबागमध्ये 90 मिमी, मुरुडमध्ये 77 मिमी, तर श्रीवर्धनमध्ये 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कोकणात येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले की, मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून हवामानातील परिस्थिती आता पावसासाठी अनुकूल बनली आहे. सध्या वातावरणात आर्द्रता वाढली असून वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशाच्या वरील हवामानस्तरावर चक्रीय वातस्थिती तयार झाली आहे. तसेच उत्तर कर्नाटक ते दक्षिण आंध्रप्रदेश दरम्यान पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात २७ जुलैपर्यंत पावसाला गती मिळेल.
कोल्हापूर, पुणे, सातारा घाटमाथ्यांना 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
मुंबई आणि ठाण्यात बुधवार व गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर पालघर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यांना मंगळवारपासून तर पुणे घाट परिसराला बुधवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई आणि कोकण परिसरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
