पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये देखील लाटांची उंची 3.4 ते 3.8 मीटरपर्यंत जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मासेमारी करणाऱ्या लहान बोटी, होड्या समुद्रात जाऊ नयेत अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. ही माहिती राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या भागांमध्ये पुढील 24 तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत.
advertisement
राज्यात काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्य देखील सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मौजे हदगाव नखाते येथे झालेल्या 117.8 मिमी पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या गावात सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ कारवाई करत छतावर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बरडा गावात देखील अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली. गावातील एका मंदिरात अडकलेल्या तीन नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिली आहे.
राज्यभरात पुढील काही दिवस हवामानात अस्थिरता राहणार असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खासकरून किनारपट्टी व घाटमाथ्याच्या भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.