कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारी 12.35 वाजता 4.8 मीटर उंचीची भरती येणार आहे. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
रेड अलर्ट कुठे?
पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांची पातळी वेगाने वाढत आहे. प्रशासनाने जलसाठ्यांवर लक्ष केंद्रित करत आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
विदर्भात पावसाचा जोर कायम, नद्यांना पूराचा इशारा
विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नद्यांना पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना आवश्यक त्या सुरक्षाविषयक सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हजेरी
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार असला, तरी काही भागांत सरी आणि ढगाळ हवामान कायम राहील.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून, नाशिकमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिक आणि प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
राज्यभरात पूरप्रवण भागांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले असून, धरणांच्या पातळीकडे लक्ष ठेवले जात आहे. आपत्कालीन बचाव पथक सज्ज असून, आवश्यकता भासल्यास स्थानिक नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे.
IMD च्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे 26 आणि 27 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करून सुरक्षित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
