कोकणाला रेड अलर्ट
कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. हवामान विभागाने या भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रवास करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
advertisement
शेतकऱ्यांना इशारा
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये 120 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण ढगाळ असून पावसाच्या सरी कधीही कोसळू शकतात. हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ निवडण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये 20 ते 50 मिमी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान 24 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रतेचे प्रमाणही जास्त राहण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी पावसाळी आजारांपासून सावध रहावे.
विदर्भ
नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या भागात पावसाची तीव्रता तुलनात्मकदृष्ट्या कमी राहील, मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र व खानदेश
नाशिक, जळगाव आणि धुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
दरम्यान, राज्यातील नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात. शहरांतील प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी देखील सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
