गुप्त माहितीवरून रचला सापळा
मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास कृषी विभागाला एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. वाहन क्रमांक MH 20 DE 0999 असलेला ट्रक संवत्सरा परिसरातून वैजापूरच्या दिशेने जात असून त्यामध्ये बनावट रासायनिक खताची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. माहितीची खातरजमा होताच कृषी विभागाचे निरीक्षक गणेश बिरवाडे आणि पोलिस पथकाने तातडीने सापळा रचत संबंधित ट्रक थांबवला.
advertisement
ट्रकची तपासणी आणि मोठा साठा उघड
ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये रासायनिक खताच्या एकूण ४७७ पोत्या आढळून आल्या. चौकशीदरम्यान ट्रक चालक भुजंग नामदेव केवार (राहणार बौद) याच्याकडे या खतासंदर्भातील कोणतीही वैध बिले, परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा साठा बेकायदेशीर आणि संशयास्पद असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. जप्त केलेल्या खताचे एकूण वजन सुमारे २४ टन असून त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत सुमारे ६ लाख २४ हजार २४० रुपये इतकी आहे.
गुन्हा दाखल, कंपन्यांवरही कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह संबंधित चार कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३१६(४) तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उपनिरीक्षक संदीप सोझे आणि दिव्या थेटे यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
एपीएमसी गोदामात ट्रक सील
जप्त करण्यात आलेला ट्रक पुढील तपासणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नेण्यात आला असून तेथे तो सील करण्यात आला आहे. एपीएमसीने केलेल्या प्राथमिक तपासणीत संबंधित खत खते (नियंत्रण) आदेश १९६५ तसेच उत्पादन शुल्क कायदा १९६६ अंतर्गत आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
या घटनेनंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी खत खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, बिल व पावत्या जतन कराव्यात आणि संशयास्पद साठा किंवा वाहतूक आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे. बनावट खतामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
