केशर शेतीचा सखोल शोध आणि अभ्यास..!
कोणतंही नवं काम करण्यापूर्वी त्यामागचा पाया भक्कम असणं गरजेचं असतं. हेच तत्त्व मनात ठेवून छत्रपती संभाजीनगर येथील सीए प्रिया अग्रवाल यांनी केशर शेतीच्या शक्यतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा धांडोळा घेतला आणि देशातील काही ठिकाणी झालेल्या यशस्वी प्रयोगांचा अभ्यास केला. त्या माध्यमातून संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक आणि संशोधकांशी संवाद साधत त्यांनी अधिक बारकावे समजून घेतले.
advertisement
Agrcultre News : रब्बी पिकांची वाढ होईल चांगली, कोणत्या कराव्या उपाययोजना? संपूर्ण माहितीचा Video
यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन केशर लागवडीच्या तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास केला. केवळ तेच नव्हे, तर काश्मीरमध्ये भेट देऊन तेथील शेतकऱ्यांकडून केशर शेतीची प्रत्यक्ष माहिती गोळा केली. थंड हवामानात उगवणारं केशर योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने उष्ण प्रदेशातही घेता येऊ शकतं, याची त्यांनी प्रत्यक्ष खात्री करून घेतली. यानंतर कुटुंबीयांशी चर्चा केली आणि अखेर घरीच उपलब्ध जागेत केशर निर्मितीचा प्रयोग सुरू करण्याचा निर्णय प्रिया अग्रवाल यांनी पक्का केला.
शंभर चौ. फुटात अत्याधुनिक सेटअप व खर्च
काश्मीरसारख्या थंड हवामानात उमलणारं केशर उष्ण प्रदेशात तयार करणं कठीण मानलं जातं. मात्र अग्रवाल यांनी घराच्या मागे असणाऱ्या सुमारे शंभर चौ. फुटाच्या खोलीत त्यांनी विशेष तयार केलेला कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट सेटअप उभारला. भिंतींना विशेष थर्मल शीट लावून खोलीतील तापमान नियंत्रित राहील अशी व्यवस्था केली. तसेच कायम थंड हवामान राखण्यासाठी कोल्डिंग मशीन बसवले. योग्य आर्द्रता निर्माण व्हावी म्हणून स्वतंत्र ह्युमिडिटी कंट्रोल यंत्रणा जोडली.
केशराच्या कंदांना नैसर्गिक परिस्थितीचा अनुभव मिळावा म्हणून सूर्यप्रकाशातील आवश्यक घटक पुरवणाऱ्या स्पेशल लाईट्स बसवण्यात आल्या, तर वातावरणात पक्ष्यांसारखा नैसर्गिक आवाज राहावा यासाठी साऊंड सिस्टीम लावली. एकूणच अवघ्या शंभर चौ. फुटात प्रियांनी केशर शेतीसाठी एक छोटेखानी पण आधुनिक प्रयोगशाळाच उभारली आहे. या केशर लागवडीच्या प्रयोगासाठी सर्व उपकरणांना आणि खोलीतील वातावरण निर्मिती करण्यासाठी 4 लाख रुपये तर केशर बियाणांसाठी असा एकूण 7 लाख रुपयांपर्यंत खर्च लागला असल्याचे देखील अग्रवाल यांनी म्हटले आहे.





