परंपरेपलीकडचा विचार, प्रयोगशीलतेची वाट
दीपक जगताप यांना अंजीर शेतीचा १७ ते १८ वर्षांचा अनुभव आहे. जवळपास सात एकर क्षेत्रावर त्यांनी अंजीर बाग विकसित केली असून, पिकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि काटेकोर व्यवस्थापन हीच त्यांच्या शेतीची खरी ताकद आहे. याच अनुभवाच्या आधारावर त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. बारामतीच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात स्ट्रॉबेरी शक्य नाही, असे अनेकांनी सांगितले मात्र त्यांनी अभ्यास, नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हा समज चुकीचा ठरवला.
advertisement
पिकाची ‘भाषा’ समजणे हेच खरे तंत्रज्ञान
“पानांचा रंग, झाडाची वाढ आणि हालचाल पाहिली की पीक काय सांगत आहे हे कळायला हवे,” असे दीपक जगताप सांगतात. झाडांच्या गरजा वेळेत ओळखणे, रोग येण्याआधीच लक्षणे टिपणे आणि योग्य वेळी उपाययोजना करणे हा त्यांच्या यशाचा पाया ठरला. थ्रिप्स, माईट्स आणि मूळकुज यांसारख्या समस्यांवर त्यांनी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन केले. निसर्गाशी सुसंवाद साधत शेती करण्याची ही पद्धत त्यांच्या प्रयोगाला निर्णायक ठरली.
हवामान व्यवस्थापनाचा यशस्वी प्रयोग
स्ट्रॉबेरीसाठी त्यांनी वाई परिसरातून ‘विंटर’ वाणाची सुमारे १० हजार रोपे आणली. लागवड करताना मात्र पारंपरिक पद्धतीऐवजी स्थानिक परिस्थितीनुसार बदल केले. ऑक्टोबरमधील उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी त्यांनी लागवडीनंतर त्वरित प्लास्टिक मल्चिंग न करता तीन आठवड्यांनंतर ते केले. त्याचबरोबर उसाच्या पाचटाचा वापर करून ‘स्ट्रॉ मल्चिंग’ केल्याने जमिनीचे तापमान नियंत्रित राहिले, ओलावा टिकून राहिला आणि रोपांना नैसर्गिक गारवा मिळाला.
कमी क्षेत्रात मोठे अर्थकारण
पारंपरिक उसासाठी एक एकर क्षेत्र आणि सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यातून साधारण १.५ ते २ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. याउलट, जगताप यांनी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. सुरुवातीला लेंडी खत व गांडूळ खताचा वापर करून बेड तयार केले. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला दरवेळी १० ते २० किलोच उत्पादन मिळत होते, त्यामुळे शंका वाटली; मात्र पुढे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
५–६ महिन्यांत लाखोंचा नफा
फक्त ५ ते ६ महिन्यांत सुमारे ९ ते ९.५ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च वजा जाता ४.५ ते ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा हातात पडला. पुढील दोन महिन्यांत आणखी उत्पादन मिळणार असल्याने नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कमी क्षेत्र, कमी कालावधी आणि जास्त उत्पादन या सूत्रामुळे हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.
थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच
उत्पादनाबरोबरच मार्केटिंगवरही त्यांनी विशेष लक्ष दिले. स्थानिक बाजारावर अवलंबून न राहता कोल्हापूर, बेळगाव आणि बेंगळुरू बाजारपेठांमध्ये थेट माल पाठवण्यात आला. सुरुवातीला प्रति किलो ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नंतर दर कमी झाले तरी सातत्यपूर्ण उत्पादनामुळे उत्पन्न स्थिर राहिले.
