3 हजार रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय कोटी रुपयांवर
अमरावतीमधील अंजनगाव बारी येथील शेतकरी रवींद्र मेटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत आहेत. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी कामाला सुरुवात केली. फक्त 3 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. आज त्याच व्यवसायाची उलाढाल वर्षाला 15 ते 16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सध्या त्यांच्या फार्मवर 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत.
advertisement
रवींद्र मेटकर सांगतात की, त्यांचे वडिल चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यांच्या वडिलांना आई-वडील नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मॅट्रिकनंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी पीएफमधून 3 हजार रुपये दिले आणि त्यांनी 100 कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला जागा नसल्यामुळे त्यांनी घराच्या छतावर 10 वर्ष हा व्यवसाय केला. त्या काळात कोंबड्यांची संख्या 400 पर्यंत वाढली.
यानंतर आईला वारसाहक्काने मिळालेली 4 एकर शेती विकून बडनेरा येथे जमीन घेतली. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन 5 लाख रुपयांत 4 हजार ब्रॉयलर कोंबड्यांचा फार्म सुरू केला. 1995 ते 2006 दरम्यान व्यवसाय चांगला सुरू होता. मात्र 2006 मध्ये बर्ड फ्लूमुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. त्यानंतर 2008 मध्ये पुन्हा बँक ऑफ इंडियाकडून 25 लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी नव्याने सुरुवात केली. त्या वेळी 20 हजार कोंबड्या घेतल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी 10 हजार कोंबड्यांची वाढ करत आज त्यांची संख्या 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. बँकेचे कर्जही त्यांनी पूर्ण फेडले आहे.
विदर्भातील एकमेव वातानुकूलित स्वयंचलित युनिट
सध्या त्यांच्या फार्मवर काही कोंबड्यांचे स्वयंचलित युनिट आहे. त्याचबरोबर ते विदर्भातील एकमेव वातानुकूलित स्वयंचलित युनिट आहे. या युनिटमध्ये खाद्य देणे, अंडी बाहेर काढणे आणि साफसफाई ही कामे मशीनद्वारे केली जातात. यामुळे श्रम वाचतात आणि उत्पन्नातही वाढ झाली आहे. कोंबड्यांचे खाद्य ते स्वतः तयार करतात, त्यामुळे खर्च कमी होतो.
दररोज जवळपास 1 लाख 20 हजार अंडी उत्पादन होते. अंड्यांच्या दरानुसार दिवसाला सुमारे 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. या व्यवसायात सध्या 50 कामगार काम करत आहेत. वार्षिक उलाढाल 15 ते 16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच हे यश मिळाल्याचे रवींद्र मेटकर सांगतात.
चर्चा सत्रात आपल्या यशाची कहाणी सांगणार
त्यांच्या या संघर्षाची दखल इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने घेतली. 1 ते 5 मे 2026 दरम्यान होणाऱ्या चर्चा सत्रात रवींद्र यांना आमंत्रित केले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमच्या या चर्चा सत्रात विदर्भातील शेती व कुक्कुटपालन कशा पद्धतीने केले जाते. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसं यशस्वी होऊ शकतं, याचा अनुभव रवींद्र मेटकर ऑक्सफर्डमध्ये मांडणार आहेत. तीन हजार रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 1 लाख 80 हजार कोंबड्या, दररोज 1 लाख 20 हजार अंडी उत्पादन आणि वातानुकूलित कुक्कुटपालन केंद्रापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे.
ग्लोबल इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय?
ग्लोबल इकॉनॉमिक फोरम किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच हे जगभरातील उद्योग, शेती, तंत्रज्ञान आणि धोरणनिर्मितीतील अग्रगण्य व्यक्तींना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. या व्यक्तींना एकत्र आणून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते.अशा मंचावर सहभागी होण्यासाठी व्यक्तीच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणे आवश्यक असते. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी अत्यल्प भांडवलातून उभा केलेला कोट्यवधींचा कुक्कुटपालन व्यवसाय आणि त्यांची शाश्वत शेती पद्धती यामुळे त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले गेले. तसेच त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळाले आहेत.
याच कामगिरीची दखल घेत मार्च 2026 मध्ये त्यांना इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रण देण्यात आले. हे आमंत्रण त्यांना 12 मार्च 2026 रोजी देण्यात आले.





