उसाच्या पट्ट्यात 'पैशाचं पीक', 15 गुंठे शेती अन् 5 महिन्यात लखपती, सांगलीच्या शेतकऱ्यानं कशी केली कमाल? Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture Success: वडील शामराव भोसले यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सुनील यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर व्यवस्थापनाचा मेळ साधत ही मिरची शेती केली.
सांगली: सांगलीच्या ऊस पट्ट्यामध्ये उसासह केळी, आले या पिकांचे दर्जेदार उत्पादन प्रगतशील शेतकऱ्याने आता तिखट मिरचीचा नवा प्रयोग यशस्वी केला आहे. पलूस तालुक्यातील बांबवडे येथील सुनील भोसले यांनी 15 गुंठे जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली. यातून 5 महिन्यात त्यांनी चार लाखांची कमाई केली. वडील शामराव भोसले यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सुनील यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर व्यवस्थापनाचा मेळ साधत ही मिरची शेती केली.
सुनील भोसले यांच्याकडे चार एकर बागायत शेतजमीन आहे. यामध्ये पीकपध्दतीत बदल करण्याच्या उद्देशाने त्यांनी 15 गुंठे क्षेत्रामध्ये '55 31' या वाणाची लागवड केली. सहा फुट अंतरावर बेड तयार करून क्रॉस पद्धतीने दीड फुटांवर एक रोप अशा पध्दतीने 3000 रोपांची लागवड केली.
advertisement
आधुनिक तंत्राचा वापर
रोप लागवडीनंतर 20 दिवसांनी काठी आणि तारेने मिरचीच्या झाडांना आधार दिला. तणावर नियंत्रण राहण्यासाठी मल्चिंग पेपर अंथरला आहे. तसेच ठिबकने पाणी व रासायनिक खतांचा पुरवठा केला आहे.
प्रतिकूल हवामानात सांभाळला मळा
भोसले यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये हिवाळ्यात मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला कडाक्याच्या थंडीमुळे प्लॉट सुरू होण्यास महिनाभर उशीर झाला; मात्र भोसले यांचे अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि मेहनतीमुळे पिकाला चांगला प्रतिसाद मिळाला.
advertisement
15 गुंठ्यात 6 टन उत्पादन
बदलत्या वातावरणात देखील काटेकोर व्यवस्थापनामुळे भोसले यांना मिरचीचे भरघोस उत्पादन घेता आले. पहिल्याच तोड्यापासून दहा किलोसाठी सुमारे सातशे रुपये दर मिळाला. त्यानंतरही दर टिकून राहिल्याने दोन महिन्यात सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या मिरचीला दहा किलोसाटी आठशे ते नऊशे रुपये दरम्यान बाजारभाव मिळत असून पुढील चार महिन्यांत अनखी दोन ते अडीच लाख रुपयांचे हमखास उत्पन्न असल्याचे सुनील भोसले यांनी लोकल18सोबत बोलताना सांगितले.
advertisement
प्लॉट उभारण्यासाठी एक लाख रुपये खर्च
पंधरा गुंठे प्लॉटसाठी त्यांनी शेणखत व कंपोस्ट खत मिळून सुमारे दहा टन खतांचा वापर केला. रोपलावणीवेळी सुमारे दहा हजार रुपयांचा बेसल डोस दिला. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व जाळीचे संरक्षण कुंपण यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे भोसले सागतात. संपूर्ण प्लॉट उभारण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च झाला.
advertisement
भाजीपाला शेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते. हे भोसले यांनी दाखवून दिले आहे. मिरचीच्या मळ्यामध्ये वडील शामराव भोसले, आई रंजना, पत्नी अश्विनी तसेच मुले यश व हर्ष असे संपूर्ण कुटुंब राबते आहे. मजुरांवर अवलंबून न राहता कुटुंबातील सदस्यांनी रोज थोडा वेळ शेतात काम केले तर शेतीत चांगले यश मिळू शकते, असा आदर्श भोसले कुटुंबाने घालून दिला आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
उसाच्या पट्ट्यात 'पैशाचं पीक', 15 गुंठे शेती अन् 5 महिन्यात लखपती, सांगलीच्या शेतकऱ्यानं कशी केली कमाल? Video









