Agriculture News : कमी पाण्यात मिळेल भरघोस उत्पादन, उन्हाळ्यात करा या पिकांची निवड, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे गरजेचे ठरत आहे.
बीड : उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत शेती करणे आव्हानात्मक मानले जात असले तरी योग्य पिकांची निवड आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी कमी पाण्यातही चांगले उत्पादन घेऊ शकतात. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे गरजेचे ठरत आहे. उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि विविध भाजीपाला पिके ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतात, असं बीडमधील कृषी तज्ज्ञ शरद राठोड सांगतात.
उन्हाळ्यातील प्रमुख नगदी पिकांमध्ये भुईमूगाचा समावेश होतो. हलक्या ते मध्यम जमिनीत भुईमूगाची लागवड चांगली होते. योग्य वेळी पेरणी केल्यास आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते तसेच उत्पादनात वाढ होते. याशिवाय रोग आणि कीड नियंत्रणावर लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.
advertisement
मका हे देखील उन्हाळ्यासाठी उपयुक्त पीक मानले जाते. कमी कालावधीत तयार होणाऱ्या या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. योग्य खत व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि पाण्याचे नियोजन केल्यास मक्याचे उत्पादन अधिक वाढवता येते. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात मक्याच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.
याशिवाय भाजीपाला पिकांनाही उन्हाळ्यात विशेष महत्त्व आहे. भेंडी, कारली, दोडका, काकडी, टरबूज आणि खरबूज यांसारखी पिके कमी कालावधीत तयार होतात आणि बाजारात त्यांना चांगला दर मिळतो. विशेषतः शहराच्या जवळील भागात भाजीपाल्याची मागणी अधिक असल्याने शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेचा फायदा मिळू शकतो.
advertisement
उन्हाळ्यात शेती करताना ठिबक सिंचन, मल्चिंग आणि योग्य पीक निवड यावर भर दिल्यास कमी पाण्यातही भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे. योग्य नियोजन, वेळेवर पाणी आणि खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उन्हाळ्यातील शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात, असं कृषी तज्ज्ञ शरद राठोड सांगतात.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : कमी पाण्यात मिळेल भरघोस उत्पादन, उन्हाळ्यात करा या पिकांची निवड, कृषी तज्ज्ञांचा सल्ला






