सांगली - अलीकडे बिबट्यांचा वावर मानवी वस्तीतही वाढू लागला आहे. सांगलीच्या सागरेश्वर अभयारण्य लगतच्या परिसरात तर उसाचे शेत हेच बिबट्याचे हक्काचे घर बनत चालले आहे. इथे शेतात तसेच मानवी वस्तीलगत पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून सतत हल्ले होत आहेत. अशातच बिबट्याने एका रेडकावर हल्ला केला.
सोनहिरा परिसरातील आसद येथील शेतकरी सुनील जाधव जनावरे घेऊन डोंगरालगतच्या शेतात चरायला गेले असताना अचानक बिबट्याने रेडकावर हल्ला केला. यावेळी शेतकऱ्याने आणि म्हैशींनी बिबट्याच्या अंगावर धावून जात स्वतःचा आणि रेडकाचा जीव वाचवला. शेतकरी सुनील लक्ष्मण जाधव यांनी लोकल18 शी बोलताना घडलेला वृत्तांत सांगितला.
advertisement
यावेळी त्यांनी सांगितले की, "डोंगराच्या पायथ्यालगत असणाऱ्या शेतामध्ये मी नेहमीप्रमाणे जनावरे चारावयास गेलो होतो. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावाकडे परतत होतो. अचानक रेडकू मोठ्याने ओरडले. त्याच्या आवाजाने मी जनावरांच्या कळपाजवळ जावू लागलो. यावेळी बिबट्याने रेडकाचा गळा पकडला होता, असे दिसून आले आणि हा बिबट्या माझ्यापासून फक्त पाच फूट अंतरावर होता. बिबट्याला पाहून मी मोठ्याने ओरडलो. मी ओरडताच बिबट्या जनावरांच्या कळपात गेला. माझ्या ओरडण्याने दोन्ही म्हशी सावध झाल्या.
म्हशींनी बिबट्याच्या पाठीमागे लागत बिबट्याला पळवून लावले. यावेळी 6 महिन्याच्या रेडकाला बिबट्याने पकडले होते. परंतु रेडकाच्या गळ्यात दोरीचा कंडा होता. त्यामुळे बिबट्याची पकड सैल झाली आणि त्या दोरीच्या कंड्यामुळे रेडकाचा जीव वाचला.
49 स्पर्धक, 30 वर्षांची परंपरा, पुण्यात पालिकेकडून राबवली जातेय किल्ले बनवण्याची स्पर्धा, VIDEO
हल्ल्यामध्ये बिबट्याचा दात रेडकाच्या मानेमध्ये लागला. रेडकाला खोलवर जखम झाली. बिबट्या 25 फुटावर दूर जाऊन परत फिरून माझ्याकडे आणि माझा जनावरांकडे पाहत होता. आम्ही मात्र भीतीने गावाचा रस्ता धरला," असे त्यांनी सांगितले.
आम्हाला जनावरे चारण्यासाठी रोजच डोंगराकडे जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. यामुळे आमचे शेतात जाणे कठीण झाले आहे. याकडे वन खात्याने गांभीर्याने लक्ष देवून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे वाटते," अशी मागणीही शेतकरी सुनील जाधव यांनी यावेळी केली.
या हल्ल्यात 6 महिन्यांच्या रेडकाच्या गळ्याला जखम झाली. मालकाच्या सावधानतेमुळे व म्हशींनी बिबट्याला पळवून लावल्यामुळे लहान रेडकाचा जीव वाचला आहे. रेडकाच्या गळ्यात दोरीचा कंडा असल्याने बिबट्याच्या जबड्यातून रेडकू निसटले. परंतु भुकेलेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला केला. यावेळी सुनील जाधव व दोन्ही म्हशी बिबट्याच्या अंगावर मोठ्याने ओरडत धावून जात बिबट्याला पळवून लावले. या प्रसंगाने शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.