जालना : तब्बल 14 क्विंटल वजनाच्या पवन नावाच्या रेड्याने जालना शहरात भरलेल्या गोदा कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल दररोज 15 लिटर दूध, 10 किलो ढेप तर आठवड्यात 2 किलो तूप असा आहार असलेल्या पवन रेड्याचे आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे छोटू भुरेवाले यांनी संगोपन केले आहे. जालना शहरामध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या पवनची चर्चा असून लोकल 18 च्या प्रतिनिधीने त्याच्या आहाराविषयी आणि दिवसभराच्या दिनचर्येविषयी छोटू भुरेवाले यांच्याकडून माहिती जाणून घेतली पाहुयात.
advertisement
पवन हा आमचा लाडका रेडा आहे. अशाच प्रकारची आणखी तीन रेडी आमच्याकडे आहेत. आमचा पारंपारिक म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. एकूण 51 म्हशी असून पवन हा सगळ्यात लाडका आहे. याला दररोज 15 लिटर दूध, 10 किलो ढेप तर आठवड्याला 2 लिटर तूप दिले जातं. सकाळी पाच ते सहा पिढ्या कडबा, चार ते पाच पेंढ्या उसाचे वाढे आणि सकाळी पाच लिटर दूध, पावशेर तूप आणि पाच किलो ढेप असा आहार दिला जातो. तर सायंकाळच्या वेळी दहा लिटर दूध, पाव किलो तूप व पाच किलो सरकी ढेप दिली जाते, असं छोटू भुरेवाले यांनी सांगितलं.
उज्जैन येथील एका व्यापाऱ्याने याला 3 लाख 60 हजार रुपये किंमतीमध्ये विकत मागितले होते. मात्र आम्ही त्याला न विकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशींच्या नैसर्गिकरीत्यातून याच्या आहारा विहाराचा काही प्रमाणात खर्च निघतो. मात्र बऱ्याचदा खिशातूनही पैसे टाकावे लागतात. परंतु कुटुंबातील सदस्य प्रमाणे याचे संगोपन केले असल्याने आम्ही याची विक्री करत नसल्याचे छोटू भुरेवाले यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
जालना शहरात सुरू असलेल्या गोदा कृषी प्रदर्शनामध्ये पवन या रेड्याची चर्चा आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये पवन हा एक चर्चेचा विषय ठरला असून एवढ्या मोठ्या वजनाचा रेडा नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असल्याने प्रत्येकासाठीच हा आश्चर्याचा विषय ठरत आहे.





