प्रवास कसा सुरू झाला?
दौंड तालुक्यातील कडेठाण हे गाव पुण्यापासून अंदाजे 70 किमी अंतरावर असून, येथील शेतकरी प्रामुख्याने ऊस शेती करतात. निलम दिवेकर यांनी सुरुवातीला महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले.त्यानंतर ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. "उमेद" योजनेच्या माध्यमातून त्यांनी ड्रोन दिदीसाठी अर्ज केला आणि कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय त्यांना हे ड्रोन मंजूर झाले.पीपीएल खत कंपनीने त्यांना हे ड्रोन थेट घरपोच दिले.
advertisement
ड्रोन मिळाल्यानंतर त्यांनी फलटण येथील तारामित्र ड्रोन अकादमीत प्रशिक्षण घेतले. याशिवाय, कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. प्रारंभी त्यांनी स्वतःच्या शेतात सराव केला आणि नंतर इतर शेतकऱ्यांसाठी सेवा देण्यास सुरुवात केली.
ड्रोन वापराचे फायदे
सामान्यतः पारंपरिक पद्धतीने एका एकरासाठी २०० लिटर पाणी लागते, मात्र ड्रोन फवारणीसाठी केवळ 10 ते 15 लिटर पाणी पुरेसे असते. तसेच एका वेळेत ड्रोनद्वारे 3 एकर शेतीवर फवारणी करता येते.यामुळे वेळ, श्रम आणि औषधांचा मोठा खर्च वाचतो.
राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली
निलम दिवेकर यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. तसेच, भोपाळमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांसमोर त्यांचे कार्य सादर झाले.पुण्यातील अटारी येथे पार पडलेल्या कार्यक्रमातही त्यांचा गौरव करण्यात आला.
700 एकरावर फवारणी
आजवर त्यांनी दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, हवेली, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांमध्ये फवारणी सेवा दिली आहे. त्यांची सेवा घेणारे शेतकरी पुन्हा त्यांनाच फवारणीसाठी बोलावत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे शेत 150 ते 200 किमी अंतरावर आहे,तेथे फवारणीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. आतापर्यंत त्यांनी एकूण 700 एकरावर शेतीवर फवारणी केली आहे.
कुटुंबाचा भक्कम आधार मिळाला
निलम यांच्या या प्रवासात त्यांचे पती भीमराव दिवेकर यांचा मोठा हातभार आहे. सातत्याने प्रवास करावा लागतो, प्रशिक्षणासाठी आठवडाभर घराबाहेर राहावे लागते, तरीही पतीने त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला.विशेष म्हणजे,आता त्यांचे पती आणि मुलगाही ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत.
आर्थिक गणित कसं?
एका एकर फवारणीसाठी 600 ते 800 रुपये शुल्क आकारले जाते. एका दिवसात 4 ते 12 ते 20 एकर क्षेत्रावर फवारणी केली जाते, काहीवेळा हे प्रमाण 20 एकरांपेक्षाही अधिक जाते.सरासरी 10 एकर क्षेत्र गृहीत धरल्यास, त्यांना दिवसाला 6,000 ते 7,000 उत्पन्न मिळते.प्रवास, चार्जिंग, मजुरी आणि देखभाल यांचे खर्च वगळल्यानंतर, त्यांना महिन्याला साधारणतः 60,000 ते 1,00,000 इतका नफा मिळतो.
दरम्यान, निलम दिवेकर यांनी शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याचा उत्कृष्ट आदर्श उभा राहिला आहे.
