जालन्यातील तळेगाव येथील मोसंबी उत्पादकांना मोसंबीच्या भाववाढीची अपेक्षा होती. बाजारामध्ये मोसंबीला 10 ते 12 रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने भाव 20 ते 22 हजार रुपये प्रति टनापर्यंत जातील आणि आपल्याला चांगलं उत्पन्न हाती येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोसंबी बागेची तोड टाळली.
advertisement
परंतु निसर्गाचे कधीही न पाहिलेले रौद्ररूप सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळालं. बाराशे ते तेराशे मोसंबी झाडावर असलेली 25 ते 30 टन मोसंबी अति पाण्याने जमिनीवर पडलीये. दोन टन मोसंबी देखील झाडावर शिल्लक नाही. घरी गेलं तर विवाहयोग्य बहीण दिसते आणि शेतात आलं तर झालेलं नुकसान. सरकारने ठोस भरपाई दिली नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे श्रीकिशन शिवतारे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
याच गावातील विजय शिवतारे यांची देखील 800 झाडांची मोसंबी बाग आहे. सावकारी कर्ज काढून त्यांनी या बागेचे पोषण केलं. या बागेतून सात ते आठ लाख उत्पन्न होईल या उत्पन्नातून कर्ज फेडून दसरा दिवाळी सारखे सण साजरे करता येतील अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. परंतु या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलंय. शासनाने हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपये एवढी मदत मोसंबी फळबाग धारकांना केली तरच आम्ही तग धरू शकतो नाहीतर गळ्याला फास लावल्याशिवाय पर्याय नसल्याचे विजय शिवतारे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.