जालना : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील कापसानंतर सोयाबीन ही प्रमुख कॅश क्रॉप आहे. परंतु नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी बंद झाल्यानंतर बाजारात सोयाबीनच्या दरात आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन विक्री न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर मात्र पाणी फेरले आहे. सोयाबीनला सरकारने 4892 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बारदानाच्या अभावामुळे अनेक दिवस हमीभाव केंद्र बंद होती. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना नोंदणी झाल्यानंतरही नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्री करता आले नाही. आता या शेतकऱ्यांना खाजगी बाजारात अत्यंत कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करावी लागत आहे.
advertisement
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजारात दररोज 2500 ते 3000 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. या सोयाबीनला 3800 ते 3950 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. सोयाबीनचा हाच दर हमीभावाने खरेदी केंद्र सुरू असताना 4000 ते 4500 क्विंटल असा होता. हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहिल्यानंतर बाजारात दर एका पातळीपर्यंत स्थिर राहतात. मात्र खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर व्यापारी आणखी भाव खाली आणतात. याचा प्रत्यय यावर्षी देखील आल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे भाव वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन घरातच साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.
अडीच एकरात लावली द्राक्षे, आता 25 एकराचा मालक, एकरी नफा 10 लाखांचा!
सोयाबीनचे दर बऱ्याचदा सोया पेडीला असलेली मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातली स्थिती यावर अवलंबून असतात. ब्राझील आणि अमेरिका या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या देशातील उत्पादनाचे आकडे पाहूनच आपल्या देशातील सोयाबीनचे दर ठरतात. शेतमालाला बाजारात मागणी असल्यास हमीभाव पेक्षाही अधिक दराने विक्री केली जाते. हे आपण चण्याच्या बाबतीत पाहतच आहोत. आगामी काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य पावले उचलली गेली तर सोयाबीनचे भाव निश्चितच वाढू शकतात, असे जालन्यातील व्यापारी अशोक पाचफुले यांनी सांगितले.





