पिकं पिवळी पडण्यामागची खरी कारणं
कृषी तज्ज्ञांच्या मते पिकं पिवळी पडण्यामागे एकच कारण नसून अनेक घटक एकत्रितपणे जबाबदार असतात. बहुतेक वेळा शेतकरी केवळ कीड किंवा रोगांवर लक्ष केंद्रित करतात, मात्र मूळ समस्या माती, पाणी आणि पोषणाशी संबंधित असते.
मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता
नायट्रोजन, लोह (आयर्न), मॅग्नेशियम, झिंक यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता ही पिकं पिवळी पडण्याचं प्रमुख कारण आहे. नायट्रोजनची कमतरता असल्यास संपूर्ण पान पिवळं पडतं.
advertisement
लोहाची कमतरता असल्यास वरची नवीन पानं पिवळी पडतात, पण शिरा हिरव्या राहतात.फक्त फवारणी करून ही समस्या सुटत नाही, तर माती परीक्षण करून योग्य खत व्यवस्थापन गरजेचं असतं.
मातीचा pH आणि क्षारता
माती खूप आम्लीय (acidic) किंवा क्षारीय (alkaline) असल्यास अन्नद्रव्यं पिकांना उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत खत दिलं तरी ते शोषलं जात नाही. तज्ज्ञ सांगतात की अनेक भागांत जमिनीचा pH बिघडलेला असून त्यामुळे पिकं पिवळी पडतात. pH दुरुस्तीसाठी जिप्सम, चुना किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक ठरतो.
अती पाणी किंवा पाण्याचा ताण
अतिपाणी दिल्यास मुळांना हवा मिळत नाही आणि मुळे कुजतात. यामुळे पिकं पिवळी पडतात. दुसरीकडे, पाण्याचा ताण (दुष्काळी परिस्थिती) असल्यासही पानांचा रंग बदलतो. तज्ज्ञांच्या मते योग्य पाणी व्यवस्थापन हे हिरव्या पिकांचं मुख्य सूत्र आहे.
फवारणीचा अतिरेक, फायदा कमी, नुकसान जास्त
“जास्त फवारणी म्हणजे जास्त उत्पादन” हा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आढळतो. मात्र अति रासायनिक फवारणीमुळे पिकांवर ताण येतो, पानं जळतात आणि प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी केलेली फवारणीही पिवळेपण वाढवते.
मुळांवरील रोग आणि सूत्रकृमी
कधी कधी वरून पीक निरोगी दिसतं, पण मुळांवर रोग किंवा सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झालेला असतो. अशा वेळी खतं आणि फवारणीचा परिणाम होत नाही. त्यामुळे मुळांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
