बीड : सध्याच्या आधुनिक युगात नोकरी आणि शेती या दोन क्षेत्रांत समतोल साधून यशस्वी होणं सोपं काम नाही. मात्र बीड जिल्ह्यातील विलास राठोड यांनी या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जात एक प्रेरणादायी उदाहरण सादर केलं आहे. वडिलोपार्जित फक्त दोन एकर शेती आणि मर्यादित आर्थिक स्रोत असूनही त्यांनी जिद्द, मेहनत आणि हुशारीच्या जोरावर स्वतःचं आयुष्य घडवलं आहे.
advertisement
विलास राठोड यांचं शिक्षण कर्जाच्या आधारावर पूर्ण झालं. शिक्षणानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत वर्क फ्रॉम होम तत्वावर नोकरी सुरू केली. त्यासाठी त्यांना केवळ 22,000 रुपये पगार मिळतो. घरचं आर्थिक पाठबळ कमी असल्याने नोकरीसोबतच शेतीतूनही उत्पन्न मिळवण्याचा विचार त्यांनी मनाशी पक्का केला. विलास यांनी भुईमुगाच्या शेतीचा निर्णय घेतला. सुरुवातीला फक्त पाच गुंठ्यांवर भुईमुगाची लागवड केली. या प्रयोगाला समाधानकारक यश मिळाल्याने त्यांनी हुरूप घेतला आणि पुढच्या हंगामापासून एक एकर क्षेत्रात भुईमुगाची लागवड सुरू केली. त्यांनी शेतीत आधुनिक पद्धतींचा अवलंब केला आणि प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक नियोजन केलं.
शिक्षण घेताना स्ट्रॉबेरीचा प्रयोग, सोलापुरात पिकवलं पीक, 10 गुंठ्यात 4 लाखांचे उत्पन्न
विलास राठोड यांच्या भुईमुगाच्या शेतीचं यश आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतंय. एका एकर शेतीतून ते वर्षभरात 50 क्विंटलपेक्षा अधिक भुईमुगाचं उत्पादन घेतात. वर्षातून रब्बी आणि खरीप अशा दोन हंगामांत भुईमुगाची लागवड केल्याने त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे. खर्च वजा जाता त्यांना दरवर्षी अडीच ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. विलास राठोड यांचा प्रवास फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. त्यांनी नोकरी आणि शेती यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे. घरून काम करत असताना शेतीसाठी वेळ काढून त्यांनी स्वतःचं आर्थिक बळकटपण सिद्ध केलं आहे.
विलास राठोड यांच्या यशाची गोष्ट ग्रामीण भागातील युवकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. मर्यादित संसाधने असूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग आणि नियोजनाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. विलास राठोड यांची कहाणी ग्रामीण भारतातील युवकांना प्रेरणा देणारी आहे. नोकरी करत करत कमी जागेत शेतीतून मोठं उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.