विमा क्षेत्रात प्रामुख्याने दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे लाइफ इन्शुरन्स आणि दुसरा जनरल इन्शुरन्स. लाइफ इन्शुरन्स हा व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असतो. एखाद्या व्यक्तीने आयुष्याचा विमा उतरवलेला असतो आणि त्या व्यक्तीच्या निधनानंतर विम्याची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनी) दिली जाते.
advertisement
जनरल इन्शुरन्समध्ये अनेक प्रकारचे विमे येतात. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठीचा मेडिक्लेम, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, वाहन विमा, शेती विमा, गुरांचा विमा, दुकान किंवा दागिन्यांचा विमा अशा विविध योजनांचा समावेश होतो. म्हणजेच जीवनाव्यतिरिक्त मालमत्ता, आरोग्य किंवा अपघाताशी संबंधित जोखीम यांचा विमा जनरल इन्शुरन्स अंतर्गत घेतला जातो.
लाइफ इन्शुरन्समध्येही अनेक योजना असतात. त्यामध्ये टर्म इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. टर्म पॉलिसीमध्ये प्रीमियम तुलनेने कमी असतो, पण कव्हरेज जास्त असते. अनेक जाहिरातींमध्ये दरमहा 500 रुपये भरा आणि 1 कोटी रुपयांचा विमा घ्या असे सांगितले जाते. हा टर्म इन्शुरन्सचा प्रकार असतो. मात्र या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरला जातो, पण परतावा (रिटर्न) मिळत नाही. विमाधारकाचा मृत्यू झाल्यासच नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम मिळते.
त्याचप्रमाणे एंडोमेंट पॉलिसी हा आणखी एक प्रकार आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा दोन्ही गोष्टी असतात. ठराविक कालावधीनंतर पॉलिसीधारकाला काही रक्कम परत मिळते, तसेच विम्याचे संरक्षणही मिळते. यामध्ये ‘सर्व्हायव्हल बेनिफिट’ म्हणजेच ठराविक कालावधीनंतर लाभ मिळण्याची सुविधा असते.
आरोग्याशी संबंधित विम्यामध्ये मेडिक्लेम पॉलिसी महत्त्वाची मानली जाते. एखाद्या व्यक्तीला आजारपण किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास उपचाराचा खर्च या पॉलिसीद्वारे भरला जातो. याशिवाय पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी देखील घेतली जाते. या पॉलिसीत नैसर्गिक मृत्यूला कव्हरेज नसते, मात्र रस्ते अपघात, पडणे किंवा इतर अपघाती मृत्यूंसाठी विमा संरक्षण मिळते. या प्रकारच्या पॉलिसीमध्ये अनेकदा कमी प्रीमियममध्ये जास्त रकमेचे कव्हरेज मिळत असल्याने काही जण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात.
काही प्रकरणांमध्ये खोटा अपघात दाखवून विमा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, अपघाताचा खोटा अहवाल देणे किंवा काही वेळा डॉक्टरांना हाताशी धरून वैद्यकीय कागदपत्रे तयार केल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा फ्रॉडमध्ये कधी कधी संपूर्ण यंत्रणाही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
विमा कंपन्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसारख्या नसतात, तर त्या ग्राहकांच्या विश्वासावर चालणाऱ्या संस्था असतात. त्यामुळे पॉलिसी घेताना फॉर्ममध्ये आरोग्य, आजार किंवा वैद्यकीय इतिहासाबाबत खरी माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असते. चुकीची माहिती दिल्यास किंवा काही गोष्टी लपवल्यास भविष्यात विमा दावा (क्लेम) मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
विमा तज्ज्ञ राजेंद्र पाटील यांच्या मते, प्रत्येक पॉलिसी ही वय, आरोग्यस्थिती, महिला-पुरुष यांसारख्या घटकांनुसार वेगळी असते. त्यानुसार प्रीमियम आणि कव्हरेज निश्चित केले जाते. त्यामुळे विमा घेताना सर्व अटी समजून घेणे आणि योग्य माहिती देणे आवश्यक आहे.





